प्रतिनिधी / कोल्हापूर
आयसोलेशन हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेल्या लॅब टेक्निशियनना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक ईश्वर परमार यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
नगरसेवक परमार यांनी निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या संकटात महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमधील कोविड सेंटरने अत्यंत मोलाची वैद्यकीय सेवा दिली आहे. यामध्ये लॅब टेक्निशियनचे योगदानही मोलाचे राहिले आहे. पण आता मुदत संपल्याने सेवेतून कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. केरळ आणि दिल्लीत कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नजिकच्या काळात शहरासाठीही उपाययोजना कराव्या लागतील. त्यामुळे मुदत संपलेल्या लॅबटेक्निशियनना मुदतवाढ देण्यात यावी. त्याचबरोबर अन्य कर्मचाऱयांची मुदत संपली असल्यास त्यांनाही मुदतवाढ द्यावी.