महापालिकेचा कोरोना गंभीर रूग्णांच्या जीवाशी खेळ; वैद्यकीय अधिकार्यांसह प्रशासनातील अधिकार्यांचे दुर्लक्ष
संजीव खाडे / कोल्हापूर
महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या गंभीर रूग्णांवरील उपचारात नादुरूस्त व्हेटिंलेटरचा वापर सुरू असल्याचा प्रकार पुढे आला आहे. नादुरूस्त आणि कमी फ्लोने ऑक्सिजन पुरवठा करणार्या व्हेटिंलेटरमुळे कोरोना रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असून या प्रकाराकडे हॉस्पिटल प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. महापालिकेचा आरोग्य विभागही ढिम्म आहे. महापालिकेच्या प्रशासनातील बडे अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचा आरोप नादुरूस्त व्हेटिंलेटर मोफत दुरूस्त करून देण्यासाठी पुढे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांच्यासह किशोर शहा, अवधूत भाटे व इतर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात सीपीआर हॉस्पिटलमधील नादुरूस्त झालेली 21 व्हेटिंलेटर मोफत दुरूस्त करून देण्याची जबाबदारी घेतली. त्यासाठी त्यांना राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (सीपीआर) अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी परवानगी दिली. 21 पैकी 11 व्हेटिंलेटर कार्यकर्त्यांनी नामवंत कंपनीच्या तंत्रज्ञांमार्फत दुरूस्त करून दिले. दुरूस्तीचा सर्व खर्च या कार्यकर्त्यांनी स्वतः आणि लोकवर्गणीतून केला.
दरम्यान, आयसालेशन हॉस्पिटलमधील व्हेटिंलेटरच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी बुधवारी बंडा साळुंखे यांच्यासह किशोर शहा, अवधूत भाटे आणि एसजीएल टेक्नो या कंपनीचे तंत्रज्ञ आकाश लोंढे गेले होते. लोंढे यांनी स्वतः कोरोना वॉर्डमध्ये जावून तेथील रूग्णांना लावलेल्या व्हेटिंलेटरची तांत्रिक तपासणी केली. सात पैकी सहा व्हेटिंलेटर पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एक व्हेटिंलेटर खराब झाल्याचे सांगत विनावापर बाजूला ठेवला होता, पण लोंढेच्या तपासणीत तो व्हेटिंलेटर सुस्थितीत असल्याचे दिसले. सहा व्हेटिंलेटर नादुरूस्त असल्याने त्यातून शंभर टक्के पूर्ण क्षमतेने (फ्लोने) ऑक्सिजन कोरोना रूग्णाला मिळत नसल्याचे निदर्शनास आले. अशा पद्धतीने गंभीर रूग्णाला जर कमी क्षमतेने ऑक्सिजन मिळाला तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नादुरूस्त व्हेटिंलेटर सीपीआर प्रमाणेच मोफत दुरूस्त करून देण्याचा निर्णय बंडा साळुंखे आणि कार्यकर्त्यांनी घेतला. त्यांनी महापालिकेतील अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. नादुरूस्त व्हेटिंलेटर आम्ही मोफत दुरूस्त करून देतो, आपण परवानगी द्या, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केल्यानंतर अधिकार्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी टाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित विभागाच्या अधिकार्याशी, डॉक्टरशी बोलण्यानंतर सांगतो, अशी उत्तरे देण्यात आली. महापालिकेतील बड्या अधिकार्यांशीही संपर्क केल्यानंतर त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, अशी व्यथा बंडा साळुंखे यांनी `तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.
कोरोना वॉर्डातील स्थिती बाहेर कळत नाही आयसोलेशन हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डातील स्थिती बाहेर कळत नाही. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी, इतर स्टाफ वगळता रूग्णांचे नातेवाईक, सामान्य नागरिक या वॉर्डात जात नाहीत, कोरोना वॉर्डाबद्दल नागरीकांत भीतीही आहे. त्यामुळे आत नेमके काय चालले आहे? हे बाहेर कळत नाही. त्यामुळे नादुरूस्त व्हेटिंलेटरची माहिती कार्यकर्त्यांच्या पाहणीनंतर बाहेर आली.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये चार व्हेटिंलेटर विनावापर कोरोनाच्या संकटात व्हेटिंलेटरची गरज कधी आणि केव्हा भासेल याची शाश्वती नाही. अशावेळी उपलब्ध व्हेटिंलेटरचा वापर जास्तीत जास्त झाला तर गंभीर कोरोना रूग्णांचा जीव वाचू शकतो. मात्र नॉन कोविडसाठी असलेल्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील चार व्हेटिंलेटर विनावापर पडून आहेत. त्यांचा वापर कोरोनाच्या गंभीर रूग्णांसाठी होऊ शकतो. मात्र महापालिकेच्या एकाही जबाबदार अधिकार्याला त्याविषयी देणे-घेणे नाही, अशी स्थिती असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.
एक व्हेटिंलेटर एका महिन्यात कोरोनाच्या किमान आठ ते दहा रूग्णांना जीवदान देऊ शकतो. सद्यःस्थितीत व्हेटिंलेटर जीवरक्षक ठरत असताना महापालिकेच्या अधिकार्यांना त्याच्या दुरूस्तीविषयी फारसे गांभीर्य नाही. आम्ही दुरूस्त करून देण्याची विनंती केल्यानंतरही उडावाउडवीची उत्तरे मिळाली.
– संभाजी उर्फ बंडा साळुंखे, अध्यक्ष, सेवाव्रत प्रतिष्ठान