फायजर, मॉडर्नाच्या लसी मागविण्यासाठी जोरदार हालचाली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या लसींची देशात पुन्हा चाचण्या घेण्याची गरज भासणार नाही, अशी स्पष्टोक्ती देण्यात आली आहे. भारताच्या औषध नियामक मंडळाने फायजर, मॉडर्ना अशा लसेसाठी भारतात स्वतंत्र चाचण्या घेण्याची अट दूर केली आहे. या निर्णयामुळे भारतात लवकरच विदेशी लसी मागविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत लसउत्पादन वाढविण्याबरोबरच विदेशात यशस्वी ठरलेल्या लसी आयात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार लस आयातीतील अडचणी दूर करून फायजर, मॉडर्नासारख्या परदेशी लसी लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिलेल्या स्पष्टोक्तीनुसार आता लसींच्या ब्रिजिंग चाचण्या करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. विदेशात लसीकरण झालेल्या लसींना यापूर्वी ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी मिळालेली असेल तर त्याची गुणवत्ता आणि स्थिरता भारतात तपासण्याची गरज भासणार नाही. यासंबंधी नॅशनल एक्स्पर्ट ग्रुपने शिफारस केली होती. ही शिफारस स्वीकारण्यात आली आहे. त्यानुसार ‘डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समाविष्ट असलेली लस किंवा आतापर्यंत लाखो लोकांचे लसीकरण झालेल्या लसींची देशात पुन्हा ब्रिजिंग चाचणी होणार नाही. सदर लसी संबंधित देशाच्या राष्ट्रीय नियंत्रण प्रयोगशाळेने प्रमाणित केलेल्या असल्याने त्यांच्या प्रत्येक बॅचची चाचणी घेण्याची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.