मनपा कर्मचाऱयांची स्थिती, अर्थ व्यवहार करण्याचा प्रभारी आयुक्तांना अधिकार नसल्याने समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका आयुक्त गेल्या आठ दिवसांपासून रजेवर गेल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. केवळ कार्यालयीन कामकाज हाताळण्याचा अधिकार प्रभारी आयुक्तांना असतो. पण अर्थव्यवहार करण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे महापालिकेचा व्यवहार ठप्प झाल्याने अधिकारी व कर्मचाऱयांचे पगारदेखील रखडले आहेत.
महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी मनपा प्रशासक जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे पंधरा दिवसांच्या रजेची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱयांनी केवळ तीन दिवसांची रजा मंजूर केली होती. महापालिका आयुक्त दि. 28 जुलैपासून रजेवर गेले होते. प्रभारी आयुक्त पदाचा कार्यभार सामान्य प्रशासन उपायुक्त म्हणून कामकाज पाहणाऱया अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
महापालिका आयुक्त दि. 30 रोजी कार्यालयात रूजू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण नऊ दिवस झाले तरी त्यांचा पत्ता नाही. तसेच त्यांची रजा वाढविण्यात आली का, याबाबतची माहितीदेखील कार्यालयात उपलब्ध नाही. तर पंधरा दिवसांच्या रजेचा अर्ज नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. नगरविकास खात्याकडूनही कोणतेच प्रत्युत्तर आले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्या सुट्टीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आयुक्तांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे. महापालिका कार्यालयातूनदेखील त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अधिकाऱयांसमोरदेखील समस्या निर्माण झाली आहे.
कार्यालयीन कामकाज पाहण्याचा अधिकार प्रभारी आयुक्तांना असतो. त्यामुळे केवळ कार्यालयीन पत्रव्यवहार व नियमित कामकाज प्रभारी आयुक्तांच्या सूचनेनुसार सुरु आहे. मात्र अर्थव्यवहार करण्याचे अधिकार प्रभारी आयुक्तांना नसतात. त्यामुळे महापालिकेचे सर्व आर्थिक व्यवहार गेल्या नऊ दिवसांपासून ठप्प झाले आहेत. महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱयांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या अखेरीस किंवा पहिल्या आठवडय़ात खात्यावर जमा करण्यात येते. पण महापालिका आयुक्त रजेवर असल्याने मनपा कर्मचाऱयांचे वेतनदेखील रखडले आहे. महापालिका आयुक्त रुजू झाल्यानंतर वेतन जमा केले जाणार आहे.