वृत्तसंस्था /वॉशिंग्टन :
भारत आणि अमेरिकेतील आयुर्वेदिक चिकित्सक तसेच संशोधक कोरोना संसर्गावरील बचावासाठी आयुर्वेदिक औषधांची संयुक्त वैद्यकीय चाचणी सुरू करण्याची योजना आखत असल्याची माहिती भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी दिली आहे. प्रतिष्ठित भारतीय-अमेरिकन वैज्ञानिक, तज्ञ आणि डॉक्टरांच्या समुहाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना संधू यांनी संस्थात्मक भागीदारीच्या व्यापक जाळय़ाद्वारे कोविड-19 च्या विरोधातील लढाईत दोन्ही देशांचे वैज्ञानिक एकत्र आल्याचे म्हटले आहे.
संयुक्त संशोधन, अध्ययन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी दोन्ही देशांच्या संस्था एकत्र आल्या आहेत. दोन्ही देशांचे आयुर्वेद तज्ञ आणि संशोधक कोविड-19 च्या विरोधात बचावासाठी आयुर्वेदिक औषधांची संयुक्त वैद्यकीय चाचणी सुरू करणार आहेत. याप्रकरणी ज्ञान आणि संशोधनाच्या साधनांचे आदानप्रदान सुरू असल्याचे संधू म्हणाले.
स्वस्त औषधनिर्मिती
भारतीय औषध कंपन्या किफायतशीर औषधे आणि लसनिर्मितीत आघाडीवर असून या महामारीच्या विरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अमेरिकेतील संस्थांसोबत भारतीय औषध कंपन्यांचे किमान भागीदारी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे भारत-अमेरिकेसह जगभरातील अब्जावधी लोकांना लाभ होणार असल्याचे उद्गार राजदूतांनी काढले आहेत.
आयुष मंत्रालय कार्यरत
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाची मदत घेतली आहे. लक्षणेरहित आणि गंभीर रुग्णांना आयुष-64, अगस्तय हरीतकी आणि अणू तेल देण्याची तयारी आहे. ही तिन्ही औषधे ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होणाऱया रुग्णांना दिली जातील. चांगले परिणाम दिसून आल्यास ही औषधे सर्वसामान्यांनाही उपलब्ध केली जाणार आहेत. यासंबंधी आयुष मंत्रालयाने मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत. भारतातही ऍलोपथीसह आयुवेंद, होमियोपथीच्या औषधांवर संशोधन सुरू आहे. याचदरम्यान आयुष मंत्रालयाने तिन्ही औषधे कोरोनारुग्ण आणि विलगीकृत लोकांना देण्याचे निर्देश दिले आहे.