केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय : दूरगामी परिणाम शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयुर्वेदिक डॉक्टरांना पर्याप्त प्रशिक्षणानंतर शस्त्रक्रिया करण्याची अनुमती देणारी अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे. त्यानुसार अशा प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टरांना सर्वसामान्य शस्त्रक्रिया, नाक, कान घसा शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, तसेच अस्थि आणि दंत शस्त्रक्रिया करण्याची अनुमती देण्यात येणार आहे.
या अधिसूचनेवर भारतीय औषध विभागाच्या मध्यवर्ती मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रशिक्षित आयुर्वेदिक डॉक्टर्स गेल्या 25 वर्षांपासून अशा शस्त्रक्रिया आयुर्वेदिक आरोग्य संस्था आणि इतर मान्यताप्राप्त रुग्णांलयांमध्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रिया वैध आहेत, तसेच पुढेही त्या वैध असल्याचेच समजले जाईल, असे या अधिसूचनेत सांगण्यात आल्याचे मंडळाने म्हटले आहे.
पदव्युत्तर शिक्षणक्रमात समावेश
शस्त्रक्रिया करण्याची प्रथा आयुर्वेदात पुरातन काळापासून आहे. ती ‘शल्यचिकित्सा’ म्हणून ओळखली जाते. आयुर्वेदात ‘शल्यतंत्र’ हा शब्द सर्वसामान्य शस्त्रक्रियांसाठी, तर ‘शालक्यतंत्र’ हा शब्द कान, नाक, घसा, मस्तक आणि नेत्र यांच्या शस्त्रक्रियांसाठी उपयोगात आणला जातो. आता या शस्त्रक्रियांच्या प्रशिक्षणाचा समावेश आयुर्वेदाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्यात येईल, असे औषध मंडळाने स्पष्ट केले. यासाठी मंडळाच्या नियमावलीमध्ये केंद्र सरकारच्या अनुमतीने आवश्यक ते परिवर्तन केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 2016 मध्ये आयुर्वेदाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची नियमावली तयार करण्यात आली होती. ती आता सुधारली जाणार आहे.
अत्याधुनिक प्रशिक्षण देणार
आयुर्वेदाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे अत्याधुनिक शिक्षण देण्यात येण्याची योजना आहे. तसेच आधुनिक शस्त्रक्रिया सामुग्री आणि साधनांचा उपयोगही त्यांना शिकविण्यात येईल. हे विद्यार्थी स्वतंत्रपणे अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्षम व्हावेत अशा प्रकारे अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यांना पचन संस्था व आतडय़ांच्या अवघड शस्त्रक्रियांचे प्रशिक्षणही दिले जाईल.
जुन्या अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण
आयुर्वेदाच्या ऐतिहासिक परंपरेला आणि शास्त्राला अनुसरून या वैद्यकशाखेच्या अभ्यासक्रमात गेल्या 25 वर्षांपासूनच शस्त्रक्रियांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारने काही नवीन केले आहे असे नव्हे. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रिया विधिवत आहेत की नाहीत यावर कोणीही आजवर आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने विचारपूर्वक आणि तज्ञांशी विचारविमर्ष करूनच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेतला जाणार नाही, अशी अपेक्षा केंद्रीय औषध मंडळाने व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले.
अत्याधुनिक प्रशिक्षण देणार
आयुर्वेदाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियांचे अत्याधुनिक शिक्षण देण्यात येण्याची योजना आहे. तसेच आधुनिक शस्त्रक्रिया सामुग्री व साधनांचा उपयोगही त्यांना शिकविण्यात येईल. हे विद्यार्थी स्वतंत्रपणे अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्षम व्हावेत अशा प्रकारे अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यांना पचन संस्था व आतडय़ांच्या अवघड शस्त्रक्रियांचे प्रशिक्षणही दिले जाईल.
जुन्या अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण
आयुर्वेदाची ऐतिहासिक परंपरा या वैद्यकशाखेच्या अभ्यासक्रमात गेल्या 25 वर्षांपासूनच शस्त्रक्रियांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारने काही नवीन केले आहे असे नव्हे. तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रिया विधिवत आहेत की नाहीत यावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने विचारपूर्वक आणि तज्ञांशी विचारविमर्ष करूनच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेतला जाणार नाही, अशी अपेक्षा केंद्रीय औषध मंडळाने व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले.
निर्णय अन् प्रतिक्रिया…
- आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा समावेश आहे पुरातन काळापासूनच
- आयुर्वेदाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया प्रशिक्षण योजना
- केंद्राच्या अधिसूचनेला ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनेचा विरोध
ऍलोपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेचा आक्षेप
आयुर्वेदिक डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रिया वैध ठरविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला ऍलोपॅथिक डॉक्टरांनी विरोध केला आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा आणि मानद महासचिव डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी पत्रक काढून या निर्णयाचा निषेध असून निर्णयाला विरोध केला आहे. आधुनिक शस्त्रक्रिया शास्त्राचा आणि आयुर्वेदाचा संबंध नाही. त्यामुळे अशी वैधता आयुर्वेदाला दिल्यास ते रुग्णांची सुरक्षा आणि वैद्यक क्षेत्राच्या गुणवत्तेसाठी धोकादायक ठरू शकते, असेही ऍलोपॅथिक डॉक्टरांचे म्हणणे आहे.