120 देशांची तिकिटे जमविली
कुणाला कसला छंद असेल? याचा काही नेम नसतो. शिवाय या छंदासाठी असे छंदिष्ट लोक कशा कशाचा त्याग करतील? हे देखील सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे असते. आपल्या छंदांसाठी आपली मालमत्ताही खर्ची घालण्यास ते मागेपुढे पाहात नाहीत. बुलंद शहरामधील महम्मद शरीफ यांना विविध देशांची पोस्टतिकिटे जमविण्याचा छंद आहे. यासाठी त्यांनी आपली वडिलोपार्जित मालमत्ताही विकली आहे. त्यांच्याकडे 120 देशांची पोस्टल तिकिटे आहेत. गेली 30 वर्षे त्यांनी हा छंद जोपासला आहे.
1 मे 1840 या दिवशी ब्रिटनमध्ये जगातील पहिले डाक तिकीट निघाले. तेव्हापासूनची तिकिटे त्यांच्याकडे असल्याचे ते म्हणतात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, इंग्लंड, जर्मनी, पाकिस्तान, युगोस्लाव्हिया, कझाकिस्तान, स्पेन, सौदी अरेबिया, इराक, ओमान इत्यादी 120 देशांची जुन्यांपासून नव्यांपर्यंत तिकिटे त्यांच्या संग्रही आहेत. त्यांना भारतीय पोस्ट विभागाने या छंदाबद्दल सन्मानितही केले आहे. आपले नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये येईल, असे त्यांना वाटते.