निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये काही आणखीन पोलीस अधिकाऱयांची बदली केली आहे. बदल्यांचा हा निर्णय सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी घेण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे संचालनालयाचे निरीक्षक शांतनू सिन्हा विश्वास यांची बदली जलपाईगुडी रेंजय पोलीस महानिरीक्षक कार्यालयात गुन्हे निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. सिन्हा यांनी पोस्टल मतपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
रविवारी रात्री बजावण्यात आलेल्या बदली आदेशानुसार आसनसोल-दुर्गापूरचे सहाय्यक आयुक्त श्रीमंत कुमार बंदोपाध्याय यांची बदली करत त्यांना बोलपूरचा उपविभागीय पोलीस अधिकारी करण्यात आले आहे. बोलपूरचे उपविभागीय अधिकारी शुभेंद्र कुमार अलिकडेच कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आदेशानुसार कृष्णानगर पोलीस जिल्हय़ातील कृष्णगंजचे निरीक्षक निहार रंजन रॉय यांना मुर्शिदाबाद पोलीस स्थानकाचे नवे प्रभारी निरीक्षक करण्यात आले आहे. यापुर्वी आतिश दास या पदावर कार्यरत होते. दास यांना पोलीस संचालनालयात पाठविण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी देखील अनेक अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी 8 टप्प्यांमध्ये मतदान करविण्यात येत असून मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे.