स्वच्छ, प्रामाणिक खेळाने विश्वासार्हता वाढविण्यासाठी विश्व फेडरेशनचे प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) ‘आय ऍम बॅडमिंटन’ जागरूकता मोहिमेची सुरुवात केली असून यासाठी त्यांनी अनेक बॅडमिंटनपटूंची ऍम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. भारताची पीव्ही सिंधू ही त्यापैकी एक असून बुधवारी विश्व फेडरेशनने तशी घोषणा केली आहे.
या मोहिमेद्वारे खेळाडूंना स्वच्छ व प्रामाणिक खेळ करीत आणि त्याचे अनुसरण करण्याचा प्रचार करीत या खेळाप्रति प्रेम व आदर व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. निर्दोष आणि प्रामाणिकपणे खेळ करणे ही कोणत्याही खेळाची सर्वात महत्त्वाची बाब असते, असे ऑलिम्पिक रौप्यविजेती पीव्ही सिंधू म्हणाली. ‘या खेळाचे दूत म्हणून आम्ही एका सुरात हा संदेश दिल्यास तो अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचेल,’ असे ती म्हणाली. ‘आवडीचा खेळ हा स्वतःसाठी खेळला पाहिजे आणि त्यातून आनंद मिळविता आला पाहिजे. गैरमार्गाचा अवलंब न करता खेळता आले तरच हा आनंद आपण मिळवू शकतो, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे,’ असे तिने स्पष्ट केले.
बीडब्ल्यूएफ इंटेग्रिटी युनिटची निर्मिती होऊन पाच वर्षे झाली असून यावेळच्या मोहिमेत विश्वासार्हतेवर जास्त भर देण्यात येणार आहे. या मोहिमेत ऍम्बॅसेडर म्हणून सिंधूप्रमाणेच कॅनडाची मिशेली लि, चीनच्या झेंग सि वेई, हुआंग या कियाँग, इंग्लंडचा जॅक शेफर्ड, जर्मनीची व्हॅलेस्का नॉब्लॉच, हाँगकाँगचा चॅन हो युएन आणि जर्मनीचा मार्क झ्वीबलर यांचाही समावेश आहे. झ्वीबलर हा ऍथलीट्स कमिशनचाही अध्यक्ष आहे. ‘या मोहिमेतून झालेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे बॅडमिंटन जगतात फक्त जागरूकताच निर्माण होणार नसून या खेळाची विश्वासार्हता वाढविण्यात खेळाडूंना उत्तेजनही मिळणार आहे,’ असे बीडब्ल्यूएफने म्हटले आहे.
2016 पासून या मोहिमेत माजी नामांकित खेळाडू आघाडीवर असून त्यात बीडब्ल्यूएफचे अध्यक्ष पॉल एरिक होयर, पॅरा बॅडमिंटन ऍथलीट्स कमिशनचे अध्यक्ष रिचर्ड पेरॉ आणि सुपरस्टार खेळाडू सायना नेहवाल, व्हिक्टर ऍक्सेलसेन, हेंद्रा सेतियावान, ख्रिस्तिना पेडरसेन, चेन लाँग, मिसाकी मात्सुमोटो, अकाया ताकाहाशी यांचा समावेश आहे. ‘स्वच्छ व शिस्तबद्ध खेळात सहभागी होणे हा प्रत्येक खेळाडूच अधिकार आहे. मॅचफिक्सिंग, भ्रष्टाचार, डोपिंग या खेलभावनेच्या पूर्णतः विरुद्ध असलेल्या बाबी आहेत. ऍम्बॅसेडर या नात्याने या खेळाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यात आम्हाला मोलाची भूमिका बजवावी लागणार आहे,’ असे होयर म्हणाले. ‘युवा आणि पॅरा बॅडमिंटनपटू डोपिंग व भ्रष्टाचारात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव नसल्याने जाळय़ातअडकण्याची जास्त भीती असल्याचे मानले जाते. अशा खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना जागृत करणे आणि स्वच्छ व प्रामाणिक खेळाचे महत्त्व पटवून देणे, ही या मोहिमेमागची संकल्पना आहे,’ असेही ते म्हणाले.