सुशोभिकरणाचे काम पूर्णत्वास
प्रतिनिधी / कराड
कराडच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत कोल्हापूर नाक्यावर नगरपरिषदेने ‘आय लव्ह कराड’ हा सेल्फी पॉईंट उभा केला. सुरूवातीला या सेल्फी पॉईंटचे प्रचंड कोडकौतूक झाले मात्र कालातरांने हा सेल्फी पॉईंटच्या अक्षरांवर धुरळ्याची वाढ होत गेली. आता पुन्हा एकदा नगरपरिषदेने अक्षरांवरील धुरळा हटवून सेल्फी पॉईंटची नव्याने रंगरंगोटी करत या परिसरात झाडांचे सुशोभिकरण केले आहे.
कराड नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात दोन वेळा देशात पहिला नंबर मिळवला आहे. शहराची स्वच्छता ठेवताना चौक सुशोभिकरणावरही पालिकेने लक्ष केंद्रित केले. यातूनच कोल्हापूर नाक्यावरील आयलॅंडमधे ‘आय लव्ह कराड’ हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला. सोशल मिडीयावर तो एवढा गाजला की बहुतांशी कराडकरांच्या स्टेटस, फेसबुक वॉलवर हा सेल्फि पॉईंट झळकू लागला. मात्र नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसे या सेल्फि पॉईंटबाबत झाले. काही दिवसानंतर या सेल्फि पॉईंटवरील अक्षरांवर धुरळा वाढत गेला. धुरळ्याचा थर वाढल्याने सेल्फि पॉईंटचा देखणेपणा कमी झाला. त्यातच आजुबाजूचे गवतही वाळून गेले. मात्र नगरपरिषदेने पुन्हा एकदा हा परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातूनच आय लव्ह कराडच्या अक्षरांवरील धुरळ्याचा थर साफ केला असून त्याची नव्याने रंगरंगोटी केली आहे. तेथील गवत, झाडांचे कटिंग करून सुशोभिकरण केले जात आहे. धुरळ्याने माखलेला सेल्फी पॉईंट पुन्हा उजळला आहे. कोल्हापूर नाका हे कराडचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावरील स्वच्छताच शहराचा चेहरा आहे. त्यामुळे तो सातत्याने स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.