वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आय लीग पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभाला केवळ काही दिवस बाकी असताना दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती गुरूवारी येथे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे देण्यात आली. सेकंड डिव्हिजनमधील एफसी बेंगळूर युनायटेड आणि भवानीपूर एफसी संघातील प्रत्येकी एका फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना चांचणीत पॉझिटिव्ह ठरलेल्या दोन फुटबॉलपटूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या हालचालीवर डॉक्टरांचे पथक निरिक्षण करीत असून कोरोना झालेल्या या दोन फुटबॉलपटूंची नावे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे गुपीत ठेवण्यात आली आहेत. आय लीग पात्रता हफुटबॉल स्पर्धेला 8 ऑक्टोबरपासून कोलकाता येथे प्रारंभ होत आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेत सहभागी होणाऱया फुटबॉलपटूंची नियमित कोरोना चांचणी घेतली जात असून यामध्ये प्रशिक्षक वर्ग आणि इतर अधिकाऱयांचाही समावेश आहे. कोरोना चांचणीत पॉझिटिव्ह ठरलेल्या खेळाडूंना क्वारंटाईनची सक्ती असून वैद्यकीय इलाज करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. आय लीग पात्र फेरी स्पर्धेतील सामने कोलकाता येथे विवेकानंद युवा भारती क्रीडांगण आणि कल्याणी येथील म्युनिसिपल स्टेडियमवर होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व संघ दाखल झाले आहेत. या संघांच्या निवासाची तसेच वाहतुकीची जबाबदारी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने घेतली आहे.