वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020-21 च्या हिरो पुरस्कृत आय लीग फुटबॉल स्पर्धेसाठी अ. भा. फुटबॉल फेडरेशनने इच्छुक नव्या फुटबॉल क्लबना अर्ज करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
देशामध्ये आय लीग फुटबॉल स्पर्धा गेली काही वर्षे सातत्याने भरविली जात आहे. या स्पर्धेला शौकिनांकडून चांगला प्रतिसादही लाभत आहे. सदर स्पर्धा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. आता 2020-21 च्या आय लीग फुटबॉल हंगामासाठी नवी दिल्ली, रांची, जयपूर, जोधपूर, भोपाळ, लखनऊ आणि अहमदाबाद या शहरातील इच्छुक फुटबॉल क्लबना निमंत्रित केले जाणार आहे. वरील शहरांमध्ये यापूर्वी आय लीग फुटबॉल स्पर्धेतील सामने खेळविले गेले नाहीत. पण आता या शहरातील फुटबॉल क्लबना आगामी फुटबॉल हंगामासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय अ. भा. फुटबॉल फेडरेशनने घेतला आहे. इच्छुक फुटबॉल क्लबना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांना टेंडर भरावा लागेल. टेंडर संदर्भातील अर्ज दिल्लीच्या फुटबॉल हाऊसमध्ये 10 ते 20 जून दरम्यान स्वीकारले जातील. या अर्जासमवेत 4 लाख रुपयांची बयाणा रक्कम भरावी लागेल. जे क्लब अद्याप आपली पात्रता सिद्ध करू शकले नाहीत, त्यांनाही संधी दिली जाईल. त्याचप्रमाणे त्यांना एएफसी क्लबस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल, असा खुलासा फेडरेशनतर्फे करण्यात आला. गेल्यावषीच्या आय लीग हंगामात एकूण 11 फुटबॉल क्लबनी आपला सहभाग दर्शविला होता. कोलकात्याचा विद्यमान विजेता मोहन बागानचा संघ एटीकेमध्ये विलीन झाला असल्याने इंडियन सुपरलीगच्या आगामी हंगामात हे दोन्ही संघ एकत्रित दिसतील.