हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची सूचना, ‘निगेटिव्ह’नंतरच संघात सामील होण्याची परवानगी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थान रॉयल्स संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याज्ञिक यांना कोव्हिड 19 ची लागण झाली असल्याचे या प्रँचायजीने बुधवारी जाहीर केले. पुढील आठवडय़ात सर्व संघ संयुक्त अरब अमिरातला प्रयाण करणार असून कोरोनाची लागण झालेली आयपीएल संघामधील ही पहिलीच घटना आहे.
19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएलची 13 वी आवृत्ती होणार असून भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा अमिरातमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला. ‘राजस्थान रॉयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याज्ञिक यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. पुढील आठवडय़ात संघातील सर्व खेळाडू दुबईला रवाना होण्यासाठी मुंबईत एकत्र येणार आहेत. ते लक्षात घेऊन ही चाचणी घेण्यात आली होती. बीसीसीआयने दोन चाचण्या घेण्याची सूचना केली असली तरी प्रँचायजींनी सर्व खेळाडू, साहायक स्टाफ आणि दुबईला जाणाऱया व्यवस्थापनातील सर्व सदस्यांसाठी जादा चाचणी घेण्याचा आग्रह केला होता. कोणताही धोका न पत्करणे हा त्यामागचा हेतू होता,’ असे प्रँचायजींनी स्पष्ट केले.
दिशांत सध्या उदयपूर येथे असून 14 दिवसांच्या क्वारंटाईनसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेण्यास सांगण्यात आले आहे. दोन आठवडय़ांच्या क्वारंटाईननंतर बीसीसीआयच्या नियमावलीनुसार त्यांची पुन्हा दोनदा चाचणी घेतली जाणार आहे. या चाचण्या निगेटिव्ह आल्या तरच त्यांना संघात सामील होण्याची परवानगी देण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतरही त्यांना सहा दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागणार असून तेथेही त्यांच्या तीनदा कोव्हिडसाठी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ‘या सर्व चाचण्या नकारात्मक आल्यानंतरच त्यांना संघात सामील होण्याची परवानगी दिली जाईल,’ असे प्रँचायजींनी निवेदनात म्हटले आहे.
दिशांत यांच्या संपर्कात गेल्या दहा दिवसांत संघातील अन्य कोणताही खेळाडू आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रँचायजी तसेच दिशांत यांनी गेल्या दहा दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी आयसोलेट व्हावे आणि स्वतःची कोव्हिड चाचणी घेण्याची विनंती ट्विटद्वारे केली आहे.