प्रतिनिधी / बेळगाव
वाघांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने गोल्याळी येथील आरएफओ श्रीनाथ कडोलकर यांनी वाघाला दत्तक घेऊन आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. नुकताच भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात दोन वाघ दाखल झाले आहेत. त्यापैकी ‘शौर्य’ नावाच्या नर जातीच्या वाघाला त्यांनी एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे.
राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातून वन्यप्राण्याला दत्तक घेणारे ते पहिले वनपाल ठरले आहेत. त्यांना आता वाघासाठी लागणारा वर्षभराचा खर्च उचलावा लागणार आहे. भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात टप्प्याटप्प्याने वन्यप्राणी आणले जात आहेत. आतापर्यंत तीन सिंह व दोन वाघ येथे दाखल झाले आहेत. या प्राण्यांच्या देखभालीसाठी दत्तक योजना राबविण्यात येत आहे. याला प्रतिसाद देत प्राणी संग्रालयात दाखल झालेल्या एका वाघाची जबाबदारी आरएफओ श्रीनाथ कडोलकर यांनी घेतली आहे. याप्रसंगी उपवन संरक्षणाधिकारी एम. व्ही. अमरनाथ, एम. बी. कुसनाळ, भुतरामहट्टी आरएफओ राकेश अर्जुनवाड यासह वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते.