बिल थकल्याने वीज तोडण्याची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
सध्या वीज वितरण कंपनीने ज्यांची वीज बिले थकलेली आहेत. त्यांच्या वीज जोडण्या तोडण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतलेय. यामुळे काही ठिकाणी वादावादीचे प्रसंगही ओढावत आहेत. असे असतानाच शुक्रवारी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीज जोडणी तोडण्यात आल्याने कार्यालय अंधारात बुडून गेले होते. वीज नसल्याने सर्व कामकाजही ठप्प झाल्याने त्याचा विविध कामासाठी आलेल्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेहमीप्रमाणे शुक्रवारी वेळेत उघडण्यात आले. अधिकारी, कर्मचारी कामाला लागण्याच्या तयारीत असताना वीज वितरण कंपनीचे वायरमन कार्यालयात आले. त्यांनी कार्यालयातील अधिकाऱयांना कार्यालयाचे दोन महिन्यांचे थकीत वीज बिल व दंड असे एकूण 85 हजार रुपये न भरल्याने कार्यालयाची वीज तोडण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, निधी न आल्याने वीज बिल थकले असून दोन तीन दिवसात ते भरण्याची व्यवस्था करण्यात येईल असे अधिकाऱयांनी सांगितले.
मात्र, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱयांनी वरुन वीज जोडणी तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश असल्याचे सांगत काही वेळात कार्यालयातील मीटरजवळील मुख्य वीज जोडणीची वायर तोडून टाकली. काही क्षणातच मग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंधारात बुडून गेले. दुपारी 12 चा सुमारास वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱयांनी अचानक येऊन वीज कनेकशन तोडल्याने संपूर्ण कार्यालयात अंधार पसरला. कार्यालयाकडे बॅकअप वा इतर जनरेटची सुविधा नसल्याने संगणक बंद झाल्याने सर्व कामच ठप्प झाले. या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या लोकांची प्रचंड गैरसोय झाली. यावेळी अधिकारी वर्ग याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात वीजेची सोय करता येईल का म्हणून प्रयत्न करत होते.
मात्र, तात्पुरत्या विजेची सोय देखील होवू शकली नसल्याने अधिकारी, कर्मचाऱयांसह एजंटांना हातावर हात मारुन बसण्याची वेळ आली. तर कामासाठी सवड काढून आलेल्या अनेकांचा दिवस या कारवाईमुळे वाया गेला.
विनंती करुनही कारवाई थांबली नाही
उपप्रादेशिक कार्यालयाचे माहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे वीज बिल अंदाजे 55000 आणि त्यावरील दंड, व्याज असे एकूण 85 हजार रुपये थकबाकी असल्याने ही कारवाई झाली आहे. मात्र, वीज बिल भरण्यासाठी शासनाकडूनच निधी न आल्याने ही दोन महिन्याची बिले थकली असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. थकीत वीज बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून काही मुदतवाढ मिळावी म्हणून कार्यालयाकडून अर्ज करण्यात आला आहे.