प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन महिने सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील शिकाऊ, पक्की, योग्यता परवान्यांचे कामकाज ठप्प होते. मात्र सोमवारपासून कोरोनाच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज सुरू होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली आहे.
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कामकाजही ठप्प होते. गेल्या महिन्यात वाहनांच्या पासिंगची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचप्रमाणे सोमवार दि. 22 जून पासून नवीन शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) दैनंदिन कोटा 40, पक्की अनुज्ञप्ती (परमनंट लायसन्स) दैनंदिन कोटा 60, योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण दैनंदिन कोटा 50 याप्रमाणे खासगी कार व दुचाकींसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रक्रिया सुरू केली आहे.
यासाठी सारथी 4.0 व वाहन 4.0 प्रणालीवर आगाऊ वेळ घेण्याची तरदूत केली आहे. शिकाऊ (लर्निंग लायसन्स) काढू इच्छिणार्यांनी संगणकीय चाचणी देताना कोरोनाच्या अनुषंगाने काही खबरदारी घ्यावयाची आहे. यासाठी दोन अर्जदारांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे, अर्जदारास मास्क व हॅण्डग्लोज परिधान केले असतील तरच आरटीओ कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी एक दिवस अगोदर वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जलद कामकाज होण्यासाठी वाहनधारकांनी याची नोंद घेणे आवश्यक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली आहे.