गोडोली/प्रतिनिधी
शासकीय महसूल गोळा करण्यासाठी प्रत्येक कार्यालय कर्तव्य पार पाडत असते. आरटीओ कार्यालयाने गतवर्षी ९० कोटी ४१ लाख महसुलाची वसुली केली होती. गत आर्थिक वर्षात तब्बल१२३ कोटी २३ लाख महसुलाची राज्यात लक्षवेधी वसुली केली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण आणि टीमने दमदार कामगिरी करून दाखवली आहे.
ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात कराड, पाटण वगळून सर्व तालुक्यांसाठी सातारा आरटीओ कार्यालयाचे कार्यक्षेत्र आहे. नियमित तपासणी पथक, थकित मोटार कर वसुली, थकीत पर्यावरण कर वसुली, आकर्षक नंबर फी, नवीन वाहन नोंदणी शुल्क यातून गत आर्थिक वर्षात तब्बल १२३ कोटी २३ लाखांचा महसूल वसूल करत शासनाच्या तिजोरीत भर टाकली आहे.
वर्षभरात जिल्हाभर तपासणी पथकाने आपली कामगिरी करताना दिलेल्या टार्गेट पेक्षा जादा ५,७६३ वाहनांवर कारवीई केली. यातून दंड आणि कर असे ५ कोटी ३२ लाखांचा महसूल जमा केला.
वाहनांचा थकीत मोटार वाहन कर गोळा भरण्यासाठी १२ हजार पेक्षाही जास्त वाहनधारकांना थेट पत्रव्यवहार केला गेला. वाहन नोंदणी करताना आणि वाहन रस्त्यावर आढळून आले की कारवाई केल्या. यासाठी अधिकाऱ्यांना स्वतंत्र जबाबदारी दिली. गतवर्षीत थकीत मोटार वाहन कर हा १२ कोटी ९२ लाख वसूल करण्याची कामगिरी फत्ते केली आहे.
थकीत पर्यावरण कर वसूलीसाठी ५० हजार पेक्षाही जास्त वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर कर मागणीपत्र घरपोच पाठवली गेली. यातून कारवाई टाळण्यासाठी वाहन धारकांनी गतवर्षीत ३ कोटी ४४ लाख कर जमा केला आहे. आता पर्यावरण कर भरला नाही की संबंधित वाहन धारकांचे प्रकरण न्यायालयात दाखल केले जाणार आहे.
जिल्ह्यात आपल्या वाहनांला आकर्षक नंबर असावा, ही क्रेझ वाढली आहे. आकर्षक नंबर फी मधून २०-२१ मध्ये २ कोटी २६ लाख जमा झाले होते तर २१-२२ मध्ये ३ कोटी ६७ लाख जमा झाले आहेत. गत आर्थिक वर्षामध्ये ३३ हजार १०३ इतक्या नविन वाहनांची नोंद या कार्यक्रमात झाली आहे.