अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 2 जुलै 2021, सकाळी 9.30
● जिल्हाधिकारी आज काय निर्णय घेणार ● गत सात दिवसात वाढले 5 हजार 978 रूग्ण ● आज जिल्ह्यात 803 नवे रूग्ण वाढले. ● सरासरी पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या पुढे. ● एकूण रूग्णसंख्येने ओलांडला 1 लाख 95 हजारांचा आकडा
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख पुन्हा एकदा हजाराकडे निघाला असून, जिल्ह्यासाठी आणि नियम न पाळणारांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण गेल्या सात दिवसात आरटीपीसीआर चाचण्यांच्या सरासरी टक्केवारीचा विचार करता पॉझिटिव्हीटी रेट वाढला असून तो 10 टक्क्यांच्या पुढे पोहचला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आजच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 803 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण रूग्णसंख्या 1 लाख 95 हजार 94 वर पोहचली आहे.
सात दिवसात 66 हजार चाचण्या
जिल्ह्यात गेल्या सात दिवसांच्या कोरोना आकडेवारीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवले असूल आठवड्यात दररोज सुमारे 10 हजार चाचण्या केल्या गेल्या. सात दिवसात 66 हजार 241 चाचण्या करण्यात आल्या. त्यामधे 5 हजार 978 रूग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग जून महिन्याच्या शेवटी पुन्हा काहीप्रमाणात वाढू लागला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
आरटीपीसीआर चाचण्यांच्या टक्केवारीवर आज चर्चा
महाराष्ट्र शासनाच्या नव्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात आता तीन स्तर करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटवर जिल्ह्याचा स्तर ठरवला जात आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातील आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिव्हीटी रेट पाहून जिल्हाधिकारी प्राधिकरण निर्णय घेईल. सात दिवसातील दैनंदिन कोरोना आकडेवारीचा विचार करता आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या पुढे गेल्याचे दिसतेय. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्बंधांबाबत निर्णय होऊन सायंकाळपर्यंत आदेश जारी होतील.
गुरुवारी जिल्ह्यात बाधित 803, मुक्त 816, मृत 23
गुरुवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने 1088298, एकूण बाधित 195094, कोरोनामुक्त 181523, मृत्यू 4409, उपचारार्थ रुग्ण 10465