ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रतनजीत नारायण प्रताप उर्फ आरपीएन सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आज भाजपात प्रवेश केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आरपीएन सिंह यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले.
पक्षप्रवेशानंतर आरपीएन सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मी राष्ट्र उभारणीत माझ्या योगदानासाठी मी तत्पर आहे. तसेच मी 32 वर्षे एका राजकीय पक्षात घालवली. पण तो पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही. भारतासाठी पंतप्रधान मोदींची जी स्वप्नं आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी एक कार्यकर्ता म्हणून काम करेन.
आरपीएन सिंह हे पडरौना राजघराण्यातील आहेत. ते कुशीनगरचे खासदार होते. मागील काही दिवसांपासून आरपीएन सिंह काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. आरपीएन सिंह आता कुशीनगरच्या पडरौना मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. जर सिंग यांनी पडरौना मधून निवडणूक लढवली तर, स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, कारण स्वामीही या जागेवरून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत.