तरुण भारत आयोजित कॉलेज कट्टा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /बेळगाव
गायन, वादन, नृत्य, अभिनय, मुकाभिनय, संवादफेक अशा अनेक विविध कलागुणांच्या सादरीकरणाने आरपीडी कॉलजच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. तरुण भारत आयोजित कॉलेज कट्टा अंतर्गत सोमवारी आरपीडीच्या खुल्या रंगमंचावर रंगलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या सळसळत्या उत्साहाचे रंग भरले. या कार्यक्रमाला ऍप्टेक एव्हीएशन, माणिकबाग, सुझूकी यांचे प्रायोजकत्व तसेच लोकमान्य सोसायटी व तरुण भारत सौहार्द सोसायटीचे सहकार्य लाभले.
सुत्रसंचालक विनायक बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना ‘हाऊ इज द जोश’ असे म्हणताच विद्यार्थ्यांनी यस्स सर म्हणत प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम रंगणार याची जणू पावतीच दिली. कानगोष्टी या खेळाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. एखाद्या व्यक्तीला दिला गेलेला संदेश शेवटच्या व्यक्तीपर्यंत तसाच पोहोचतो का? हे पाहणारा हा खेळ होता. अर्थात अफवा किंवा चुकीच्या बातम्या कशा पसरल्या जातात याचे प्रत्यंतरच या खेळाने दिले. त्यानतंर ‘कॅटर किलर, गायन, वाद्य वादन, रॅपीड फायर, अभियन, मीमीक्री, संवाद ओळखणे आणि समुह नृत्य’ अशा स्पर्धा पार पडल्या.
प्रत्येक फेरीतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. यापैकी काही खेळ रंगमंचावर तर काही खेळ विद्यार्थ्यांमध्ये जाऊन खेळण्यात आले. सर्वच खेळ, वजा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग लक्षणीय ठरला आणि त्यांच्यामध्ये एक नवीन उत्साह व चैतन्य निर्माण झाले. गेल्या दीड-दोन वर्षांच्या नकारात्मक वातावरणामध्ये तरुण भारत कॉलेज कट्टाने विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आणि त्यांच्या कलागुण सादर करण्याची संधी मिळाली याचा याबद्दल आरपीडी पदवीच्या प्राचार्या शोभा नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास उपस्थितीत ऍप्टेकचे प्रकाश पाटील व माणिकबाग सुझूकीचे रॉय डायल तसेच आरपीडी पियुचे प्राचार्य काशिनाथ मेळेद व शोभा नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
ऍप्टेक एव्हीएशनकडून पहिल्या 40 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून ऍप्टेक एव्हीएशनने पहिल्या 40 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले तर माणिकबाग सुझुकीने वाहन खरेदीवर 1 हजार रुपयांची सवलत व विमा काढुन देण्याचे जाहीर केले.