सिटी योजनेंतर्गत शहरात 16 ठिकाणी नव्याने सिग्नल सुविधा
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध चौकात वाहतूक नियंत्रणासाठी उभारण्यात आलेली सिग्नल सुविधा मोडकळीस आली होती. मात्र, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात 16 ठिकाणी नव्याने सिग्नल सुविधा बसविण्यात आली आहे. आरपीडी कॉर्नर आणि गोवावेस चौकातील सिग्नल व्यवस्थेचा बुधवारपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ झाला आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटर आणि स्मार्ट पोल उभारण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. अत्याधुनिक सुविधांचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या सिग्नल सुविधेचा शुभारंभ या मुहूर्तावर झाला आहे. शहरात 16 चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ट्रफिक सिग्नल उभारण्यात आले आहेत. पण सध्या केवळ आरपीडी कॉर्नर आणि गोवावेस येथील सिग्नल सुरू करण्यात आले. काही ठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अद्याप सिग्नल सुरू करण्यात आले नाहीत. मात्र टप्प्याटप्प्याने सर्व चौकातील सिग्नल व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील विविध चौकात असलेली सिग्नल सुविधा मोडकळीस आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सध्या वाहनांची रहदारी वाढली असून प्रत्येक वाहनचालक गडबडीने वाहने पुढे दामटत असतात. यामुळे चौकाचौकात वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेमधून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे आता आरपीडी चौक आणि गोवावेस येथील बसवेश्वर चौकात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ट्रफिक सिग्नल सुविधेमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.