दर्जेदार काम झाले नसल्याची नागरिकांची तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
आरपीडी चौक येथे सर्वत्र चिपिंग पसरली असून ही अपघातांसाठी कारणीभूत ठरू लागली आहे. रात्रीच्यावेळी ही चिपिंग दृष्टीस न पडल्याने दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरण्यात आलेले साहित्य चांगल्या दर्जाचे नसल्याने खडी बाहेर पडू लागली असल्याने ही चिपिंग बाजूला करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहरातील वर्दळीचा भाग म्हणून ओळख असणाऱया आरपीडी चौक येथे सध्या नवी समस्या डोकेदुखीची ठरू लागली आहे. या मार्गावरून वेगाने वाहने ये-जा करीत असतात. परंतु रस्त्यावर टाकण्यात आलेली चिपिंग पसरू लागल्याने वाहने घसरून पडू लागली आहेत. वाहने घसरून नागरिक जायबंदी होत आहेत. गोवावेस येथून आरपीडी कॉलेजच्या कॉर्नरकडे जातानाच्या रोडवर ही चिपिंग पसरली आहे. त्यामुळे ही चिपिंग वेळीच काढण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.