वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारीने देशभरात हाहाकार माजवला असून त्याच्या संसर्गामुळे अनेक क्रिकेटपटूंनाही त्याने दुखात लोटले आहे. यात आता माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंगची भर पडली आहे. त्याचे वडील शिव प्रसाद सिंग यांचे बुधवारी कोव्हिड 19 संसर्गामुळे निधन झाले.
ट्विटरच्या माध्यमातून आरपी सिंगने वडील शिव प्रसाद सिंग यांचे कोव्हिडमुळे 12 मे रोजी निधन झाल्याचे सांगितले. काही आठवडय़ापूर्वी शिव प्रसाद सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर लखनौमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. वडील आजारी असल्याने 35 वर्षीय आरपी सिंगने आयपीएल समालोचकांच्या पथकातूनही आपले नाव मागे घेतले होते. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने जेतेपद मिळविले होते. त्या संघाचा आरपी सिंग हा एक सदस्य होता. त्याने 14 कसोटी, 58 वनडे व 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 32 व्या वर्षी 2018 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि नंतर समालोचनाचे काम सुरू केले होते. तो सध्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा एक सदस्य असून पुरुष व महिला क्रिकेट संघांचे प्रशिक्षक व निवड समिती सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी या सल्लागार समितीकडे आहे.
दोनच दिवसांपूर्वी पीयूष चावलाचे वडील प्रमोद चावला यांचे निधन झाले तर चेतन साकारियानेही आपल्या वडिलांना गमविले. काही दिवसांपूर्वी महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीच्या आई व बहिणीचे कोरोनामुळे निधन झाल्याने तिला दुहेरी धक्का बसला होता.