आयपीएल टी-20 स्पर्धा : एबी डीव्हिलियर्सची 33 चेंडूत 73 धावांची आतषबाजी, ऍरॉन फिंचचे 47 धावांचे योगदान, केकेआरच्या फलंदाजांची हाराकिरी
वृत्तसंस्था / शारजाह
एबी डीव्हिलियर्स (33 चेंडूत नाबाद 73), ऍरॉन फिंच (37 चेंडूत 47), विराट कोहली (28 चेंडूत नाबाद 33), पडिक्कल (32) यांच्या फटकेबाजीनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने आयपीएल साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी सहज फडशा पाडला. डीव्हिलियर्स व विराट यांची तिसऱया गडय़ासाठी साकारलेली 100 धावांची भागीदारी आरसीबीच्या डावातील ठळक वैशिष्टय़ ठरले.
आरसीबीने 2 बाद 194 धावांचा डोंगर रचल्यानंतर प्रत्युत्तरात केकेआरला 20 षटकात 9 बाद 111 धावांवर समाधान मानावे लागले. प्रारंभी पडझड झाल्यानंतर त्यातून केकेआरला शेवटपर्यंत सावरता आले नाही. बहरातील सलामीवीर शुभमन गिलच्या 25 चेंडूतील 34 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता केकेआरच्या अन्य सर्व फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले.
विजयासाठी 195 धावांचे कठीण आव्हान असताना सलामीवीर टॉम बॅन्टॉन (8), नितीश राणा (9), इयॉन मॉर्गन (8) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि इथेच केकेआरची जबरदस्त पिछेहाट झाली. शुभमन गिलने 25 चेंडूत 34 धावा जमवल्या. नंतर धावचीत होत त्याला परतावे लागले. दिनेश कार्तिक (1), आंद्रे रस्सेल (16) यांनीही निराशा केली. पुढे देखील ही पडझड अशीच कायम राहिली आणि त्यानंतर केकेआरचा पराभव ही निव्वळ औपचारिकता होती.
गोलंदाजीच्या आघाडीवर ख्रिस मॉरिसने 4 षटकात 17 धावांमध्येच 2 बळी घेतले. याशिवाय, वॉशिंग्टन सुंदरने देखील 20 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
एबीडीची फटकेबाजी
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ऍरॉन फिंच (47) व पडिक्कल (32) यांनी 7.4 षटकात 67 धावांची सलामी दिली. पडिक्कलला रसेलने त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. ऍरॉन फिंच अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असताना प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यावेळी आरसीबीच्या खात्यावर 12.2 षटकात 2 बाद 94 धावा नोंद होत्या. त्यानंतर डीव्हिलियर्स चौथ्या स्थानी उतरला आणि उर्वरित 7.4 षटकातच त्याने विराटच्या साथीने 100 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.
डीव्हिलियर्सच्या खेळीत 6 षटकार व 5 चौकारांचा समावेश राहिला तर दुसऱया बाजूने विराटने या लढतीत संयमावर अधिक भर देत केवळ एक चौकार फटकावला. अर्थात, डीव्हिलियर्सच्या धमाकेदार खेळीमुळे आरसीबीने शेवटच्या 5 षटकात 83 धावांची आतषबाजी केली आणि याचमुळे ते 200 धावांच्या उंबरठय़ापर्यंत सहज पोहोचू शकले.
गोलंदाजीच्या आघाडीवर एम. प्रसिद्ध कृष्णाने 42 धावात 1 तर आंद्रे रसेलने 51 धावात 1 बळी घेतला. अन्य गोलंदाजांची पाटी मात्र कोरीच राहिली.
पॅट कमिन्स (0-38), चक्रवर्ती वरुण (0-25) व कमलेश नागरकोटी (0-36) यांना एकही बळी घेता आला नाही.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : ऍरॉन फिंच त्रि. गो. प्रसिद्ध कृष्णा 47 (37 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), देवदत्त पडिक्क्ल त्रि. गो. रस्सेल 32 (23 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), विराट कोहली नाबाद 33 (28 चेंडूत 1 चौकार), एबी डीव्हियिलर्स नाबाद 73 (33 चेंडूत 5 चौकार, 6 षटकार). अवांतर 9. एकूण 20 षटकात 2 बाद 194.
गडी बाद होण्याचा क्रम : पॅट कमिन्स 4-0-38-0, एम. प्रसिद्ध कृष्णा 4-0-42-1, आंद्रे रस्सेल 4-0-51-1, चक्रवर्ती वरुण 4-0-25-0, कमलेश नागरकोटी 4-0-36-0.
केकेआर : टॉम बॅन्टॉन त्रि. गो. सैनी 8 (12 चेंडू), शुभमन गिल धावचीत (उदाणा/डीव्हिलियर्स) 34 (25 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), नितीश राणा त्रि. गो. वॉशिंग्टन सुंदर 9 (14 चेंडूत 1 चौकार), इयॉन मॉर्गन झे. उदाणा, गो. वॉशिंग्टन सुंदर 8 (12 चेंडूत 1 चौकार), दिनेश कार्तिक त्रि. गो. चहल 1 (2 चेंडू), आंद्रे रस्सेल झे. सिराज, गो. उदाणा 16 (10 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), राहुल त्रिपाठी झे. मॉरिस, गो. सिराज 16 (22 चेंडूत 1 चौकार), पॅट कमिन्स झे. पडिक्कल, गो. मॉरिस 1 (3 चेंडू), कमलेश नागरकोटी त्रि. गो. मॉरिस 4 (7 चेंडू), एम. प्रसिद्ध कृष्णा नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 9 बाद 112.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-23 (टॉम बॅन्टॉम, 3.6), 2-51 (नितीश राणा, 7.6), 3-55 (शुभमन, 9.3), 4-62 (दिनेश कार्तिक, 10.3), 5-64 (मॉर्गन, 11.1), 6-85 (आंद्रे रस्सेल, 13.5), 7-89 (कमिन्स, 14.5), 8-99 (राहुल त्रिपाठी, 16.6), 9-108 (नागरकोटी, 18.6). गोलंदाजी : ख्रिस मॉरिस 4-0-17-2, नवदीप सैनी 3-0-17-1, सिराज 3-0-24-1, वॉशिंग्टन सुंदर 4-0-20-2, यजुवेंद्र चहल 4-0-12-1, उदाणा 2-0-19-1.