सलग 14 व्या वर्षी आयपीएल जेतेपदाची हुलकावणी, रोमांचक विजयासह केकेआरची दुसऱया क्वॉलिफायरमध्ये धडक
शारजाह / वृत्तसंस्था
यंदा कप आपलाच, या महत्त्वाकांक्षेने आजवर आयपीएल स्पर्धेत उतरत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला यंदा देखील आयपीएल जेतेपदाने हुलकावणीच दिली आणि त्यांच्यासाठी पराभवाचा दुष्काळ 14 व्या आयपीएल आवृत्तीत देखील कायम राहिला. सोमवारी एलिमिनेटर लढतीत केकेआरविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाने त्यांचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले. सुनील नरेनच्या अष्टपैलू योगदानामुळे केकेआरने आरसीबीचा 2 चेंडूंचा खेळ बाकी राखत पराभव केला.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा धक्कादायक निर्णय घेणाऱया आरसीबीला 20 षटकात 7 बाद 138 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात केकेआरने 19.4 षटकात 6 बाद 139 धावांसह विजयी लक्ष्य गाठले. गोलंदाजीत 21 धावात 4 बळी व फलंदाजीत 15 चेंडूत 3 षटकारांसह 26 धावांचे योगदान देणारा नरेन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
विजयासाठी 139 धावांचे किरकोळ आव्हान असताना, केकेआरची एकवेळ बिनबाद 40 वरुन 3 बाद 53 अशी दाणादाण उडाली होती. पण, केकेआरच्या फलंदाजांना 3 जीवदाने दिली गेली आणि याचा लाभ घेत ते मजल-दरमजल प्रवास करत शेवटच्या षटकात विजयाच्या पैलतीरी पोहोचले.
नरेनचे 21 धावात 4 बळी
तत्पूर्वी, विंडीजचा फिरकीपटू सुनील नरेनने 21 धावांमध्येच 4 बळी घेत आरसीबीच्या डावाला मोठा सुरुंग लावला. त्याने विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, केएस भरत यांचे बळी घेत आरसीबीला खऱया अर्थाने धक्के दिले. एकीकडे, वरुण चक्रवर्तीने (0-20) एकही चौकार दिला नाही तर शकीब हसनने देखील (0-24) फलंदाजांवर दडपण राखले. केकेआरच्या फिरकी त्रिकुटाने एकत्रित 12 षटकात अवघ्या 65 धावा दिल्या आणि यात 4 चौकारांचा समावेश होता.
देवदत्त पडिक्कल (18 चेंडूत 21) व कर्णधार विराट कोहली (33 चेंडूत 39) यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 49 धावांची दमदार भागीदारी साकारली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना धावांचा मोमेंटम अजिबात कायम राखता आला नव्हता. नंतर लॉकी फर्ग्युसनने पडिक्कलला चेंडू कट करण्याच्या मोहात पाडत त्रिफळाचीत केले आणि ही जोडी फोडली. आरसीबीचा मागील सामन्यातील हिरो केएस भरतला (15 चेंडूत 9) बरेच झगडावे लागले. तोच नरेनचा 4 पैकी पहिला बळी देखील ठरला.
कोहलीने येथेही उत्तम सुरुवात केल्यानंतर अचानक सूर हरवला. नरेनच्या फुलर लेंग्थ चेंडूवर स्लॉग स्वीप मारण्याच्या प्रयत्नात विराटने आपली विकेट गमावली. यंदा पूर्ण हंगामात खराब प्रदर्शन राहिलेल्या डीव्हिलियर्सला (11) या महत्त्वाच्या लढतीत देखील सूर सापडला नाही. अगदी आरसीबीचा हंगामातील सर्वोत्तम खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (15) देखील अपयशी ठरला. त्यानेही नरेनला स्लॉग स्वीप मारण्याच्या प्रयत्नात शॉर्ट थर्डमॅनवरील फर्ग्युसनकडे सोपा झेल दिला.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः देवदत्त पडिक्कल त्रि. गो. फर्ग्युसन 21 (18 चेंडूत 2 चौकार), विराट कोहली त्रि. गो. नरेन 39 (33 चेंडूत 5 चौकार), केएस भरत झे. अय्यर, गो. नरेन 9 (16 चेंडू), ग्लेन मॅक्सवेल झे. फर्ग्युसन, गो. नरेन 15 (18 चेंडूत 1 चौकार), एबी डीव्हिलियर्स त्रि. गो. नरेन 11 (9 चेंडूत 1 चौकार), शाहबाज अहमद झे. मावी, गो. फर्ग्युसन 13 (14 चेंडूत 1 चौकार), डॅन ख्रिस्तियन धावचीत (फर्ग्युसन-मावी) 9 (8 चेंडूत 1 चौकार), हर्षल पटेल नाबाद 8 (6 चेंडूत 1 चौकार), जॉर्ज गॅरटॉन नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 13. एकूण 20 षटकात 7 बाद 138.
गडी बाद होण्याचा क्रम
1-49 (पडिक्कल, 5.1), 2-69 (भरत, 9.4), 3-88 (विराट, 12.2), 4-102 (डीव्हिलियर्स, 14.2), 5-112 (मॅक्सवेल, 16.4), 6-126 (शाहबाज, 18.6), 7-134 (ख्रिस्तियन, 19.4).
गोलंदाजी
शकीब हसन 4-0-24-0, शिवम मावी 4-0-36-0, वरुण चक्रवर्ती 4-0-20-0, लॉकी फर्ग्युसन 4-0-30-2, सुनील नरेन 4-0-21-4.
केकेआर ः शुभमन गिल झे. डीव्हिलियर्स, गो. हर्षल 29 (18 चेंडूत 4 चौकार), वेंकटेश अय्यर झे. भरत, गो. हर्षल 26 (30 चेंडूत 1 षटकार), राहुल त्रिपाठी पायचीत गो. चहल 6 (5 चेंडूत 1 चौकार), नितीश राणा झे. डीव्हिलियर्स, गो. चहल 23 (25 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), सुनील नरेन त्रि. गो. सिराज 26 (15 चेंडूत 3 षटकार), दिनेश कार्तिक झे. भरत, गो. सिराज 10 (12 चेंडूत 1 चौकार), इयॉन मॉर्गन नाबाद 5 (7 चेंडू), शकीब हसन नाबाद 9 (6 चेंडूत 1 चौकार). अवांतर 5. एकूण 19.4 षटकात 6 बाद 139.
गडी बाद होण्याचा क्रम
1-41 (शुभमन, 5.2), 2-53 (त्रिपाठी, 6.6), 3-79 (अय्यर, 10.6), 4-110 (राणा, 14.2), 5-125 (नरेन, 17.2), 6-126 (दिनेश कार्तिक, 17.4).
गोलंदाजी
सिराज 4-0-19-2, गॅरटॉन 3-0-29-0, हर्षल पटेल 4-0-19-2, यजुवेंद्र चहल 4-0-16-2, मॅक्सवेल 3-0-25-0, ख्रिस्तियन 1.4-0-29-0.
जेव्हा नाणेफेक जिंकूनही विराटने तो निर्णय घेतला!
शारजाहमधील खेळपट्टीवर बहुतांशी वेळा धावांचा पाठलाग करणारा संघच विजयी ठरत आला आहे. मात्र, आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर चक्क प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा मोठा धक्का ठरला. नंतर लवकरच आरसीबीला मर्यादित धावसंख्येवर समाधान मानावे लागल्यानंतर सदर निर्णय चुकीचा ठरल्याचे स्पष्ट झाले. केकेआरचा कर्णधार मॉर्गनने देखील आपण नाणेफेक जिंकली असती तर धावांचा पाठलाग करणे अधिक पसंत केले असते, असे मत नोंदवले.
उद्या दुसऱया क्वॉलिफायरमध्ये केकेआर-दिल्ली आमनेसामने
आयपीएल स्पर्धेत उद्या (बुधवार दि. 13) होणाऱया दुसऱया क्वॉलिफायर लढतीत कोलकाता नाईट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने भिडणार आहेत. या लढतीतील विजेता संघ फायनलमधील दुसरा मानकरी ठरेल. चेन्नई सुपरकिंग्सने यंदा फायनलमधील स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे.
बॉक्स
वादग्रस्त शैलीवर मात करणाऱया नरेनमुळे आरसीबी ‘एलिमिनेट’!
गोलंदाजीतील वादग्रस्त शैलीमुळे सातत्याने साशंकतेच्या भोवऱयात सापडत आलेल्या सुनील नरेनला मागील काही कालावधीत आपल्या शैलीत व्यापक फेरबदल करावे लागले आहेत. मात्र, सोमवारी याच नरेनने आपल्या सुधारित शैलीसह आरसीबीचे 4 महत्त्वाचे फलंदाज गारद करत मोठा सुरुंग लावला आणि आरसीबीचा संघ या धक्यातून अगदी शेवटपर्यंत सावरला नाही. अगदी फलंदाजीतही नरेननेच 3 ‘मॉन्स्टर’ षटकार खेचत आरसीबीच्या उरल्यासुरल्या अपेक्षा संपुष्टात आणल्या.
बॉक्स
विराट कोहलीच्या आरसीबी नेतृत्वाचीही अपयशाने सांगता
आजवर एकदाही आयपीएल जेतेपद मिळवून देऊ न शकलेल्या विराट कोहलीसाठी यंदाच्या हंगामाची देखील अपयशानेच सांगता झाली. यंदाच्या हंगामानंतर आपण आरसीबी नेतृत्वावरुन पायउतार होत असल्याची घोषणा यापूर्वी विराटने केली होती.