आयपीएल साखळी सामन्यात केकेआरवर निसटती मात, शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकची फटकेबाजी निर्णायक
नवी मुंबई / वृत्तसंस्था
लढवय्या दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावांची आतषबाजी केल्यानंतर आरसीबीने आयपीएल साखळी सामन्यात केकेआरविरुद्ध रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब केले. याच दिनेश कार्तिकने निदाहास चषक स्पर्धेत खणखणीत षटकार खेचून भारताला दणकेबाज विजय संपादन करुन दिला होता, त्या आठवणीला यानिमित्ताने उजाळा मिळाला.
विजयासाठी 129 धावांचे माफक आव्हान आरसीबीसाठी केकवॉक ठरेल, अशी अपेक्षा होती. पण, प्रारंभीच 3 बाद 17 अशी दाणादाण उडाल्यानंतर त्यांना विजयासाठी अगदी शेवटच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. शेरफेन रुदरफोर्ड, हर्षल पटेल, शाहबाज अहमद व दिनेश कार्तिक यांच्या फटकेबाजीमुळे आरसीबीला हा विजय मिळवणे शक्य झाले.
शेवटच्या 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता असताना आंद्रे रसेलकडे चेंडू सोपवला गेला. या षटकातील पहिल्या चेंडूवर दिनेश कार्तिकने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे खणखणीत षटकार खेचत प्रारंभी बरोबरी साधून दिली आणि त्यानंतर दुसऱया चेंडूवर ड्रिल बॅकचा अप्रतिम चौकार फटकावत विजय संपादन करुन दिला. आरसीबीचा हा या हंगामातील पहिला विजय ठरला.
तत्पूर्वी, लंकन लेगस्पिनर वणिंदू हसरंगाने 4 बळी घेतल्यानंतर आरसीबीने केकेआरचा डाव अवघ्या 128 धावांमध्ये गुंडाळण्याचा पराक्रम गाजवला. मेगा ऑक्शनमध्ये 10.75 कोटी रुपयांची बोली लागलेल्या हसरंगाने 4 षटकांचा कोटा पूर्ण करत अवघ्या 20 धावांमध्येच 4 फलंदाज बाद केले.
24 वर्षीय हसरंगाला आकाश दीप (3-45), हर्षल पटेल (2-11) व मोहम्मद सिराज (1-25) या जलद त्रिकुटाची उत्तम साथ लाभली. आरसीबीने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
डी. वाय. पाटील स्टेडियमवरील या लढतीत केकेआरचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले. दोनवेळा आयपीएल जेतेपद संपादन करणाऱया या संघाने एकवेळ 57 धावांमध्येच 6 फलंदाज गमावले आणि यामुळे त्यांची 3 बाद 44 वरुन 14.3 षटकात 9 बाद 101 अशी जोरदार पडझड झाली होती.
केकेआरतर्फे आंद्रे रसेलने 18 चेंडूत सर्वाधिक 25 धावांचे योगदान दिले. याशिवाय, उमेश यादव (18) व वरुण चक्रवर्ती (10) यांनी शेवटच्या गडय़ासाठी 27 धावा जोडल्या. आश्चर्य म्हणजे केकेआरच्या डावातील हीच सर्वोच्च भागीदारी ठरली.
संक्षिप्त धावफलक
केकेआर ः 18.5 षटकात सर्वबाद 128 (आंद्रे रसेल 25, उमेश यादव 18, सॅम बिलिंग्ज 14. वणिंदू हसरंगा 4-20, आकाश दीप 3-45, हर्षल पटेल 2-11, सिराज 1-25).
आरसीबी ः 19.2 षटकात 7 बाद 132 (रुदरफोर्ड 40 चेंडूत 28, शाहबाज अहमद 20 चेंडूत 27, हर्षल पटेल 6 चेंडूत नाबाद 10, दिनेश कार्तिक 7 चेंडूत नाबाद 14).