सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 6 धावांनी सनसनाटी विजय, ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी
चेन्नई / वृत्तसंस्था
‘लो स्कोअरिंग मॅचेस’ अर्थात कमी धावसंख्येचे सामने रोमांचक थ्रिलर कसे ठरु शकतात, याची प्रचिती आरसीबी-हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामन्याने आणखी एकदा आली. बुधवारी येथील चेपॉक स्टेडियमवर आरसीबीला 8 बाद 149 धावा करता आल्या. मात्र, प्रत्युत्तरात या सहज आव्हानाचा पाठलाग करताना देखील हैदराबादची त्रेधातिरपिट उडाली आणि अंतिमतः 20 षटकात त्यांना केवळ 9 बाद 143 धावांवरच समाधान मानावे लागले अन् आरसीबीने 6 धावांनी रोमांचक विजय नोंदवला.
सनरायजर्सच्या शाहबाजने एकाच षटकात मनीष पांडे, बेअरस्टो व अब्दुल समद असे 3 मोहरे गारद करत या सामन्याला कलाटणी दिली. विजयासाठी 150 धावांचे आव्हान असताना सलामीवीर वृद्धिमान साहा (1) स्वस्तात परतल्याने हैदराबादची खराब सुरुवात झाली होती. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (37 चेंडूत 54) व मनीष पांडे (38) यांनी दुसऱया गडय़ासाठी 83 धावांची दमदार भागीदारी साकारत संघाला विजयाच्या ट्रकवर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. वॉर्नरने अर्धशतक साजरे केल्यानंतर जेमिसनला आक्रमक फटका लगावण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तियनकडे झेल दिला. बेअरस्टो व मनीष पांडे सलग चेंडूवर बाद झाल्यानंतर मात्र हैदराबादच्या गोटात अर्थातच खळबळ उडाली आणि यातून ते शेवटपर्यंत सावरु शकले नाहीत.
एकवेळ सहज आगेकूच करेल, असे वाटणाऱया हैदराबाद संघासमोर या पडझडीमुळे पराभव टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल की काय, असे चित्र निर्माण झाले आणि अंतिमतः तेच झाले. दडपण झुगारुन फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हैदराबादचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत राहिले आणि आरसीबीने 6 धावांनी रोमांचक विजय प्राप्त केला.
सनरायजर्स हैदराबाद ः वृद्धिमान साहा झे. मॅक्सवेल, गो. सिराज 1 (9 चेंडू), डेव्हिड वॉर्नर झे. ख्रिस्तियन, गो. जेमिसन 54 (37 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), मनीष पांडे झे. पटेल, गो. शाहबाज 38 (39 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), जॉनी बेअरस्टो झे. डीव्हिलियर्स, गो. शाहबाज 12 (13 चेंडूत 1 चौकार), अब्दुल समद झे. व गो. शाहबाज 0 (2 चेंडू), विजय शंकर झे. कोहली, गो. पटेल 3 (5 चेंडू), जेसॉन होल्डर झे. ख्रिस्तियन, गो. सिराज 4 (5 चेंडू), रशीद खान धावचीत (सिराज-डीव्हिलियर्स) 17 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), भुवनेश्वर कुमार नाबाद 2 (2 चेंडू), शाहबाज नदीम झे. शाहबाज अहमद, गो. पटेल 0 (1 चेंडू), टी. नटराजन नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 12. एकूण 20 षटकात 9 बाद 143.
गडी बाद होण्याचा क्रम
1-13 (साहा, 2.2), 2-96 (13.2), 3-115 (जॉनी बेअरस्टो, 16.1), 4-115 (मनीष पांडे, 16.2), 5-116 (समद, 16.6), 6-123 (विजय शंकर, 17.6), 7-130 (होल्डर, 18.3), 8-142 (रशीद, 19.4), 9-142 (नदीम, 19.5).
गोलंदाजी
मोहम्मद सिराज 4-1-25-2, काईल जेमिसन 3-0-30-1, वॉशिंग्टन सुंदर 2-0-14-0, यजुवेंद्र चहल 4-0-29-0, हर्षल पटेल 4-0-25-2, डॅन ख्रिस्तियन 1-0-7-0, शाहबाज अहमद 2-0-7-3.
सामन्याचा टर्निंग पॉईंट- शाहबाज अहमदचे एकाच षटकात 3 बळी!
विजयासाठी 150 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना डेव्हिड वॉर्नर बरसत राहिला आणि यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी राहील की काय, असे चित्र निर्माण झाले होते. पण, शाहबाज अहमद गोलंदाजीला आला आणि या सामन्यातील सर्व समीकरणांची अक्षरशः उलथापालथ झाली. शाहबाजने 17 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो, दुसऱया चेंडूवर मनीष पांडे तर शेवटच्या चेंडूवर अब्दुल समदला बाद करत षटकात 3 बळी वसूल केले आणि पाहता पाहता हैदराबादची 2 बाद 115 वरुन 5 बाद 115 अशी पडझड झाली.
जेव्हा हैदराबादने अवघ्या 27 धावात 7 फलंदाज गमावले!
150 धावांचे सोपे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादने एकवेळ 2 बाद 96 अशी आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, 14 व्या षटकातील दुसऱया चेंडूवर कर्णधार वॉर्नर बाद झाला आणि त्यानंतर अवघ्या 27 धावात 7 फलंदाज गमवावे लागल्यानंतर हैदराबाद विजयापासून 6 पावलांनी दूर राहिला.
विराट कोहली को गुस्सा क्यूँ आता है?
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात विराटला सर्वाधिक 7 वेळा बाद करण्याचा मान हैदराबादच्या संदीप शर्माकडे जातो. विराटच्या सुदैवाने याच संदीप शर्माला हैदराबादने राखीव खेळाडूत बसवले होते. पण, तरी येथे जम बसतो न बसतो, तोच विराट होल्डरच्या गोलंदाजीवर लाँगलेगवरील विजय शंकरकरवी झेलबाद झाला आणि त्याचा खरा संताप ड्रेसिंगरुममध्ये पोहोचल्यानंतर बाहेर पडला. विराटने ड्रेसिंगरुममध्ये पोहोचताच आपली बॅट संतापाने एका खुर्चीवर आदळली आणि चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न उमटला, विराट को गुस्सा क्यूँ आता है!