‘यलो आर्मी’ची आयपीएल साखळी सामन्यात 6 गडी राखून एकतर्फी मात
शारजाह / वृत्तसंस्था
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने शुक्रवारी आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीला 6 गडी राखून पराभवाचा जबरदस्त शॉक दिला आणि गुणतालिकेत अव्वलस्थानही काबीज केले. विराट कोहली (53) व देवदत्त पडिक्कल (70) यांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावल्यानंतरही चेन्नईने ज्या प्रकारे विजय खेचून आणला, ते स्पृहणीय ठरले. या लढतीत आरसीबीने 6 बाद 156 धावा केल्या तर प्रत्युत्तरात चेन्नईने 18.1 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 157 धावांचा पाठलाग करताना ऋतुराज व प्लेसिस यांनी 8.2 षटकात 71 धावांची दमदार सलामी दिली तर मधल्या फळीत मोईन अली (23), अम्बाती रायुडू (32), रैना (नाबाद 17) यांनीही समयोचित योगदान दिले. कर्णधार धोनी 11 धावांवर नाबाद राहिला. या विजयासह चेन्नईने 14 गुणांसह अव्वलस्थानी झेप घेतली. दिल्लीच्या खात्यावरही 14 गुण आहेत. मात्र, सरासरीच्या निकषावर चेन्नई सध्या सरस ठरली आहे. चेन्नईसाठी हा सलग दुसरा विजय तर आरसीबीसाठी सलग दुसरा पराभव ठरला.
विराट-पडिक्कलची शतकी भागीदारी
तत्पूर्वी, उत्तम, धडाकेबाज प्रारंभ केल्यानंतरही आरसीबीला 20 षटकात 6 बाद 156 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. चेन्नईचा कर्णधार धोनीने केलेले बदल सातत्याने प्रभावी ठरत गेले आणि यामुळे, विराट-पडिक्कल यांनी 13.2 षटकात 111 धावांची दणकेबाज शतकी सलामी दिल्यानंतरही आरसीबीला उर्वरित 6.4 षटकात केवळ 45 धावांची भर घालता आली.
विराट व देवदत्त यांनी आक्रमक फटकेबाजी करताना चेन्नईच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. मात्र, मधल्या फळीतील एबी डीव्हिलियर्स (12), मॅक्सवेल (11), टीम डेव्हिड (1) व हर्षल पटेल (3) या सर्व फलंदाजांना तोच टेम्पो कायम राखता आला नाही.
कोहली अनुभवी ब्रेव्होच्या गोलंदाजीवर जडेजाकडे झेल देत परतला तर पडिक्कलला शार्दुल ठाकुरने तंबूचा रस्ता दाखवला. कोहली व पडिक्कल खेळत असताना चेन्नईला दीपक चहर व हॅझलवूड या आपल्या प्रीमियर गोलंदाजांवरच अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कोहली व पडिक्कल यांनीही याच उभयतांवर अधिक तुटून पडण्यावर भर दिला.
धोनीने नंतर गोलंदाजीत अनेक बदल केले. पण, ही जोडी मैदानावर असेतोवर त्यांना या उभयतांना ना बाद करण्यात, ना त्यांच्या धावा रोखण्यात यश लाभले. डावखुऱया पडिक्कलने रविंद्र जडेजाचाही उत्तम समाचार घेतला. चेन्नईतर्फे शार्दुल ठाकुरने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 29 धावात 2 बळी घेतले तर ब्रेव्होने 24 धावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
विराट-पडिक्कलच्या शतकी भागीदारीनंतरही…
कर्णधार विराट कोहली व युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांनी या लढतीत प्रारंभी धडाकेबाज फलंदाजी करत अगदी थाटात 111 धावांची सलामी दिली होती. पण, ब्रेव्होने कोहलीला बाद करत ही जोडी फोडली आणि त्यानंतर जणू आरसीबीच्या वाटचालीला मोठा ब्रेक लागला. त्यानंतर आरसीबीला उर्वरित 6.4 षटकात केवळ 45 धावांवर समाधान मानावे लागले. आरसीबीला रोखण्यात बेव्होचा वाटा मोलाचा ठरला. त्याने 4 षटकात केवळ 24 धावा देत त्या बदल्यात कोहली, ग्लेन मॅक्सवेल (11) व हर्षल पटेल (3) यांचे बळी घेतले.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः विराट कोहली झे. जडेजा, गो. ब्रेव्हो 53 (41 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), देवदत्त पडिक्कल झे. रायुडू, गो. शार्दुल 70 (50 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), एबी डीव्हिलियर्स झे. रैना, गो. शार्दुल 12 (11 चेंडूत 1 षटकार), ग्लेन मॅक्सवेल झे. जडेजा, गो. ब्रेव्हो 11 (9 चेंडूत 1 षटकार), टीम डेव्हिड झे. रैना, गो. चहर 1 (3 चेंडू), हर्षल पटेल झे. रैना, गो. ब्रेव्हो 3 (5 चेंडू), वणिंदू हसरंगा नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 5 (लेगबाईज 3, वाईड 2). एकूण 20 षटकात 6 बाद 156.
गडी बाद होण्याचा क्रम
1-111 (विराट, 13.2), 2-140 (डीव्हिलियर्स, 16.5), 3-140 (पडिक्कल, 16.6), 4-150 (टीम डेव्हिड, 18.2), 5-154 (मॅक्सवेल, 19.2), 6-156 (हर्षल, 19.6).
गोलंदाजी
दीपक चहर 4-0-35-1, जोश हॅझलवूड 4-0-34-0, शार्दुल ठाकुर 4-0-29-2, रविंद्र जडेजा 4-0-31-0, डेव्हॉन ब्रेव्हो 4-0-24-3.
चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड झे. कोहली, गो. चहल 38 (26 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. सैनी, गो. मॅक्सवेल 31 (26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 31), मोईन अली झे. कोहली, गो. पटेल 23 (18 चेंडूत 2 षटकार), अम्बाती रायुडू झे. डीव्हिलियर्स, गो. पटेल 32 (22 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), सुरेश रैना नाबाद 17 (10 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), धोनी नाबाद 11 (9 चेंडूत 2 चौकारांसह 11). अवांतर 5. (लेगबाईज 1, नोबॉल 2, वाईड 2). एकूण 18.1 षटकात 4 बाद 157.
गडी बाद होण्याचा क्रम
1-71 (ऋतुराज, 8.2), 2-71 (प्लेसिस, 9.1), 3-118 (मोईन, 13.6), 4-133 (रायुडू, 15.4).
गोलंदाजी
मोहम्मद सिराज 3-0-23-0, सैनी 2-0-25-0, वणिंदू हसरंगा 4-0-40-0, हर्षल पटेल 3.1-0-25-2, यजुवेंद्र चहल 4-0-26-1, ग्लेन मॅक्सवेल 2-0-17-1.
धोनीसेनेकडून असाही योगायोग….2007 मध्येही 157 आणि आताही 157!
भारताने दि. 24 सप्टेंबर रोजीच 2007 टी-20 विश्वचषक जिंकला, त्यावेळी पाकिस्तानविरुद्ध अंतिम लढतीत 20 षटकात 5 गडय़ांच्या बदल्यात 157 धावा केल्या आणि त्यावेळी धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यानंतर बरोबर 14 वर्षांनी चेन्नई सुपरकिंग्सने आरसीबीविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात निर्धारित 20 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यातच 157 धावा केल्या आणि यावेळी देखील धोनीच चेन्नईचा कर्णधार होता. सोशल मीडियावर या योगायोगाचे चित्र बरेच व्हायरल होत राहिले!