नवी मुंबई / वृत्तसंस्था
नेतृत्वाची जबाबदारी सोडली असल्याने विराट कोहलीवर दडपण कमी असेल. मात्र, आज (रविवार दि. 27) पंजाब किंग्सविरुद्ध आपल्या आयपीएल मोहिमेला आरसीबी सुरुवात करेल, त्यावेळी विराट कोहलीच मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे. या लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल. विराट कोहलीकडे आरसीबीचे नेतृत्व नसण्याची ही दशकभरातील पहिलीच वेळ असेल.
आरसीबी व पंजाब हे दोन्ही संघ यंदा नव्या कर्णधारांसह आपल्या मोहिमेला प्रारंभ करतील. योगायोग म्हणजे या दोन्ही संघांना आजवर एकदाही आयपीएल जेतेपद मिळवता आलेले नाही. यंदा आरसीबीचे नेतृत्व फॅफ डय़ू प्लेसिसकडे तर पंजाब किंग्सचे नेतृत्व मयांक अगरवालकडे असणार आहे. विराट कोहलीने 2013 मध्ये डॅनिएल व्हेटोरीकडून आरसीबी नेतृत्वाची धुरा स्वीकारली आणि आता 8 हंगामानंतर त्याने राजीनामा देणे पसंत केले.
द. आफ्रिकेच्या डय़ू प्लेसिसला आरसीबीने 7 कोटी रुपयांना करारबद्ध केले असून या संघातील ग्लेन मॅक्सवेल व जोश हॅझलवूड हे दिग्गज खेळाडू पहिल्या काही सामन्यात खेळू शकणार नाहीत. मॅक्सवेल लवकरच विवाहबद्ध होणार आहे तर हॅझलवूड कसोटी संघातून पाकिस्तान दौऱयावर आहे.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.