प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनाऱयावर सुरू झालेल्या साहसी क्रीडा प्रकारातील ‘ओशन फ्लाय झिपलाईन’ प्रकल्पामुळे रत्नागिरीत येणारे पर्यटक व साहसीप्रेमींसाठी नवी पर्वणी सुरू झाली आहे. साहसी पर्यटनस्थळ म्हणून यानिमित्ताने हातभार लागणार आहे. अशा या कायमस्वरूपी प्रकल्पाचे उद्घाटन उद्या रविवार 8 मे रोजी सायंकाळी 4 वा. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला विकासचंद्र रस्तोगी (प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र), जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील समुद्रावरील या पहिल्याच झिपलाईनमुळे पर्यटकाला 1400 फुट लांब अंतरापर्यंत, समुद्रावरून आकाशात पक्षाप्रमाणे विहार करता येणार आहे. त्यामुळे निसर्गाचे अवर्णनीय रुप, समुद्राच्या फेसाळ लाटा आणि बेभान वाऱयाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. या झिपलाईन प्रकल्पामुळे रत्नागिरीच्या पर्यटन वृध्दीबरोबरच स्थानिक लोकांच्या बीचवरील उद्योगांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
पर्यटकांसाठी पूर्णपणे सुरक्षित
झिपलाईन राईड ही पर्यटकांसाठी पूर्णपणे सुरक्षित असणार असल्याचे एमव्ही ऍडव्हेंचरतर्फे रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे अध्यक्ष विरेंद्र वणजू, सदस्य दिनेश जैन, जितेंद्र शिंदे, गणेश चौगुले यांनी सांगितले. या उभारणीत सर्व तांत्रिक गोष्टींपासून ते सर्व उपकरणांपर्यंत इंटरनॅशनल स्टँडर्डसचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या साहसी पर्यटन धोरणांतर्गंत शासनाने नेमून दिलेल्या गाईडलाईन्सचे काटेकोर पालन करून झिपलाईनची उभारणी करण्यात आली आहे.