ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा काही वेळापूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली होती. मात्र, तासाभरातच आरोग्यमंत्र्यांनी या घोषणेवर यू-टर्न घेतला.
मोफत लसीबाबत डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत दिली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य सेवक आणि 2 कोटी आघाडीचे कोरोना योद्धे यांनाच ही लस दिली जाईल. त्यानंतर जुलैपर्यंत उर्वरित 27 कोटी जनतेला प्राधान्यक्रम ठरवून लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल.
सर्व भारतीयांना कोरोना लसीची गरज नाही. त्यामुळे सर्वांना लस दिली जाणार नाही. दरम्यान, सध्या देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लसीचे ड्राय रन सुरु आहे. लसीकरण कार्यक्रम राबवताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे.