महांतेश कवटगीमठ यांचे गौरवोद्गार : केएलई रुग्णालयात आरोग्य शिबिराचे उद्घाटन
प्रतिनिधी / चिकोडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यवंत व स्वच्छ भारतचे स्वप्न पाहिले असून ते सत्यात उतरविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आरोग्यवंत समाज निर्मितीत केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेतील सरकारचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी काढले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात भाजपच्या महिला मोर्चाच्यावतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करून ते बोलत होते.
कवटगीमठ पुढे म्हणाले, खेडी व शहरातील प्रत्येक महिलांना आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. महिला समाजात आई, बहीण, पत्नी अशा अनेक जबाबदाऱया पार पाडत असते. कुटुंबाचे पालनपोषण करताना त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिला सक्षम असल्याशिवाय कुटुंब सक्षम होऊ शकत नाही. त्यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत स्वावलंबी जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी राष्ट्रीय स्वराज्य संघाचे बेळगाव विभाग सहकार्यवाह संजय अडके यांनी, युवक व महिला देशाची मोठी शक्ती आहेत. ते सक्षम झाल्याशिवाय देश व कुटुंबाचा विकास होणार नाही. कुटुंबाला निरोगी व सदृढ ठेवण्याची मुख्य जबाबदारी महिलांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
150 रुग्णांची तपासणी
शिबिरात 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी राज्य सौहार्द फेडरेशनचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ, नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ, चिकोडी जिल्हा भाजप मोर्चाच्या अध्यक्षा शांभवी अश्वथपूर, चिकोडी-सदलगा भाजप मंडल अध्यक्ष संजय पाटील, शकुंतला डोणवाडे, महेश भाते, नगरसेविका वीणा कवटगीमठ, सुमा गावी, आशा पाटील, डॉ. धीरज पोळ, डॉ. तिरुमल, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. सैदापूर, प्रशांत पुजारी, डॉ. सौम्या उपस्थित होत्या.