जिल्ह्यात 12 केंद्रे, दोन सत्रात रविवारी परीक्षा
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवक, परीचारिका पदासाठी रविवारी 28 रोजी लेखी परीक्षा होत आहे. परीक्षेसाठी 7 हजार उमेदवार आहेत. ही परीक्षा 2 सत्रात जिल्ह्यातील 12 केंद्रांवर होत आहे. कोल्हापूर विभागात चार जिल्ह्यांत 49 केंद्रांवर 25 हजार उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. त्याचे नियोजन पुर्ण झाल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. बोरसे यांनी दिली.
आरोग्य विभागातील परिचारिका, आरोग्यसेवक पदासाठी 2019 मध्ये राज्यभरातून अर्ज मागवले होते. पण कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया वर्षभर रखडली होती. एका खासगी एजन्सीमार्फत या पदांसाठी परीक्षा घेतली जात आहे. रविवारी 28 रोजी सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते 5 या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. परीक्षेशी निगडीत प्रशिक्षण जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकार्यांना ऑनलाईन देण्यात आले आहे.
कोल्हापूर विभागात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. आरोग्यसेवक पदासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या सत्रात 5 हजार 314 आणि दुसर्या सत्रात 1 हजार 592 जण परीक्षा देणार आहे. येथे 12 केंद्रांवर 17 पर्यवेक्षक राहणार आहेत. लेखी परीक्षेसाठी 7 हजार उमेदवार आहेत. त्यांना ऑनलाईन हॉल तिकीट पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात शुक्रवारी सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठांनी नियोजनाचा ऑनलाईन आढावा घेतला.
विभागात रत्नागिरी जिल्ह्यात 29 केंद्रांवर 14 हजार 729 परीक्षार्थी आहेत. परीक्षेसाठी 35 पर्यवेक्षक आहेत. सांगली जिल्ह्यात 7 केंद्रांवर 3 हजार 715 विद्यार्थी परीक्षेसाठी आसनस्थ होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 हजार 83 जण या परीक्षेसाठी बसले आहेत. 2 केंद्रांवर 3 पर्यवेक्षकांच्या निरीक्षणाखाली लेखी परीक्षा होत आहे. विभागात सर्वाधिक उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यात परीक्षा देत आहेत. या परीक्षांचे नियोजन सुरू असल्याची माहिती डॉ. बोरसे यांनी दिली.