प्रतिनिधी/ फोंडा
नागामशिद-कुर्टी येथे एका फ्लॅटधारकाला एका महिलेने आरोग्य अधिकारी असल्याचे भासवून दिवसाढवळया घरातील तीन व्यक्तींना बेडरुम, वॉशरूममध्ये डांबून दागिने व रोकडसह सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लांबविला. सोनसाखळय़ा, नॅकलेस, कर्णफुले, अंगठयांसह सुमारे 175 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रू. 38 हजार मिळून सुमारे साडेसहा लाखांच्या मालासह ती महिला चोरटी पसार झाली. हा प्रकार मंगळवारी 8 रोजी सायंकाळी 4.30 वा. सुमारास घडला होता.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सुजिता सुधाकर दारसी या महिलेने याप्रकरणी फोंडा पोलिसस्थानकात रितसर तक्रार नेंदविली आहे.
मुलासह सुजिताला डांबले बेडरुममध्ये
नागामशिद कुर्टी येथील रादीया युसुफ इमारतीच्या फ्लॅटमध्ये सुजिता राहत आहे. सदर प्रकारावेळी फ्लॅटमध्ये सुजिता, तिचा मुलगा व नणंद होती. एका अज्ञात महिलेने घराची बेल वाजवून आपण आरोग्यअधिकारी असल्याचे सांगून फ्लॅटमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर सुजिताकडे काही कागदपत्राची मागणी केली. सुजिता कागदपत्रांच्या मागणीनुसार बेडरूममध्ये दाखल झाल्यानंतर तिला बाहेरून कडी घालण्यात आली. यावेळी अल्पवयीन मुलागाही तिच्यासोबत बेडरूममध्ये अडकून पडला.
नणंदेला डांबले वॉशरूममध्ये
सुजिताची नणंद सरस्वती ही वॉशरूममध्ये गेली होती, तिला तेथेच बाहेरुन कडी लावून डांबले. त्य़ानंतर चोरटय़ा महिलेने कपाटातील सर्व दागिने व रोकड लांबवून ती पसार झाली. सदर महिलेने फ्लॅटमध्ये कोण वास्तव्यास असतात याबद्दलची रेकी अगोदर केलेली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात भा.दं.सं. 392 कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.