वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट प्रेडरिक्सन भारताच्या दौऱयावर आल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी त्यांचे स्वागत केले आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली आहे. द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान प्रेडरिक्सन यांच्यात करारांचे आदान-प्रदान झाले. कृषी आणि आरोग्याच्या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
दोघांमधील ही पहिली प्रत्यक्ष भेट असली तरीही कोरोना काळात भारत आणि डेन्मार्क यांच्यातील संपर्क आणि सहकार्याचा वेग कायम होता. एक वर्षापूर्वी व्हर्च्युअल परिषदेत दोन्ही देशांदरम्यान ग्रीन स्ट्रटेजिक पार्टनरशिप स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. हा निर्णय दोन्ही देशांचा दूरगामी दृष्टीकोन आणि पर्यावरण विषयक आदराचे प्रतीक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
जल, हरित इंधनावर काम करण्यावर सहमती झाली आहे. आरोग्य अन् कृषी यासारख्या क्षेत्रांमध्येही मिळून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. भारत आणि डेन्मार्क हे दोन्ही लोकशाहीवादी देश असून नियमांवर आधारित एका आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. डेन्मार्क भारताला एक अत्यंत जवळचा भागीदार मानतो, असे प्रेडरिक्सन यांनी म्हटले आहे.
आरोग्याच्या क्षेत्रात भारताने डेन्मार्कसोबत नवी भागीदारी सुरू केली आहे. भारतात कृषी उत्पादने आणि शेतकऱयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीसंबंधित तंत्रज्ञानात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मोदी यांनी नमूद केले आहे. मोदी आणि प्रेडरिक्सन यांच्या या द्विपक्षीय चर्चेत विदेश मंत्री जयशंकर देखील सामील होते.