रिव्होल्युशनरी गोवन्सच्या सुनयना गावडे यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
नुकतेच आरोग्य खात्यात पर्मनंट पदासाठी नोकर भरती जाहीर करण्यात आली होती. यात आरोग्यमंत्र्यांनी प्रंटलाईन वर्कर म्हणून ज्यांचा सन्मान करण्यात आला होता त्यांना या पदासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु त्या कर्मचाऱयांची परीक्षा घेण्यात आली आणि निकाल जाहीर न करताच सुमारे 56 दुसऱया उमेदवारांना भरती करण्याची यादी मोबाईलवर बेकायदेशीररित्या जाहीर करण्यात आली. या उमेदवारांना कुठल्या तत्त्वांवर भरती करण्यात आले आहे याविषयी चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्सच्या महिला विभागाच्या सुनयना गावडे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
कोरोना काळात उत्तम कामगिरी केलेल्या आरोग्य कर्मचाऱयांचा आरोग्य मंत्र्यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला होता आणि यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पर्मनंट नोकर भरती होईल तेव्हा या आरोग्य कर्मचाऱयांना प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले होते. आता ही नोकरभरती जाहीर केली असताना तेव्हा या कर्मचाऱयांकडून परीक्षा घेण्यात आली आणि निकाल जाहीर न करता नोकरनियुक्तीची यादी मोबाईलवर बेकायदेशीररित्या व्हायरल झाली. यात 56जणांना नोकरी देण्यात आली ते उमेदवार कुठले हे समजणे आवश्यक आहे. ज्या परिचारिकांना जास्त अनुभव आहे त्यांना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे तसेच पुढील येणाऱया नोकरभरतीत परिचारिकांना समान अधिकाराच्या तत्त्वावर भरती करावी अशी मागणी गावडे यांनी केली.
आठ वर्षापूर्वी गावागावात 250हून जास्त परिचारिका घेतल्या होत्या. परिचारिकांना फक्त 10 हजार रूपये वेतन देतात. नर्सिंग इन्स्टिटय़ूट अडीच वर्षे शिक्षण पूर्ण करतात आणि गोमेकॉ, जिल्हा इस्पितळ इंटर्नशीप पूर्ण करतात. सर्व प्रशिक्षण घेऊनसुद्धा करियर स्थिर नाही. सरकार राष्ट्रीय कार्यक्रम घोषित करतात आणि परिचारिका जागृती करतात. सर्व प्रकारचे आरोग्यविषयक कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतात. गोमंतकीयांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी सेवा करतात. कोरोना काळातही परिचारिकांनाही उत्तम कार्य केले आहे. परंतु त्यांना कमी वेतन दिले जाते असा आरोप सुनयना गावडे यांनी केला.