विश्वजित राणेंसह मुख्यमंत्र्यांचाही हात
प्रतिनिधी/ पणजी
आरोग्यात खात्यात सुमारे 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा प्रत्यक्ष तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा अप्रत्यक्षपणे हात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. आरोग्य खात्यातील जे काम जीएसआयडीद्वारे दर वर्षी 2 कोटी रुपयांना केले जात होते तेच काम करण्यासाठी 11 कोटी 35 हजार 640 रुपयांना कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राट देताना कोणतेच रितसर सोपस्कार पूर्ण करण्यात आले नसल्याचाही चोडणकर यांनी आरोप केला आहे.
पणजी येथील काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी वरील माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जेम्स एड्रीन व तुलियो डिसोझा उपस्थित होते. विद्यमान सरकारची कार्यपद्धती चुकीची असून काँग्रेसपक्ष त्याचा निषेध करीत असल्याचे श्री. चोडणकर यांनी सांगितले आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्लंबरींग, इलेक्ट्रिकल, गार्डनिंग तसेच इतर बारीकसारीक कामासाठी सरकारने निविदा काढल्या असून हे कंत्राट एका विशेष कंपनीला देण्यात आले आहे. वास्तविक हिच कामे जीएसआयडीसी दर वर्षी दोन कोटी रुपयांना करीत होते. तेही पैसे न दिल्यामुळे जीएसआयडीने काम सोडले आहे. आत हेच कंत्राट सुमारे 12 कोटींना देण्यात आले असून दर वर्षी त्यात 5 टक्के वाढविण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. हे कंत्राट पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. सरकारला वाटल्यास पुढील नंतरच्या पाच वर्षासाठी कंत्राट कायम करण्यात येणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे. एकाबाजूने सरकार आर्थिक अडचणीत असून कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीही कर्ज काढले जात आहे. तर दुसऱयाबाजूने कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला जात आहे. एकूण सरकार सामान्य लोकांच्या पैशाची लूट करीत असल्याचा आरोपही श्री. चोडणकर यांनी केला आहे.
वास्तविक कोणत्याही खात्याच्या निविदा काढताना त्याचे योग्य सोपस्कार पूर्ण करणे जरूरीचे असते. आरोग्य खात्यातील कंत्राट देताना किंवा निविदा काढताना कोणतेही सोपस्कार पूर्ण करण्यात आलेले नाहीत. केवळ आपल्या मर्जीतील कंपनीला कंत्राट देण्यासाठी व कंपनीच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची लूट करण्यासाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. सरकारचा सगळा कारभार बेकायदेशीर असल्याचा आरोपही श्री. चोडणकर यांनी केला आहे.