प्रतिनिधी/ पणजी
गोमेकॉत निर्माण होणाऱया सर्वच नोकऱया सत्तरीतील लोकांनाच द्यायच्या असतील तर गोमेकॉचे नामकरण ‘सत्तरी मेडिकल कॉलेज’ करावे, असा सल्ला आम आदमी पार्टीने दिला आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत आप नेते ऍड. अमित पालेकर यांनी गोमेकॉत चाललेल्या नोकरभरती घोटाळ्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच या घोटाळय़ाविरोधात दक्षता विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे दोघेही या घोटाळ्याचे सूत्रधार असून दोघांनीही आपापल्या मतदारसंघातील लोकांवर नोकऱयांची बरसात केली आहे. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून कोणतीही प्रक्रिया न करताच लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा पालयेकर यांनी केला आहे.
आपच्या हाती उमेदवारांची यादी लागली असून गोमेकॉत एलडीसी पदासाठी अर्ज केलेल्या 105 पैकी 96 उमेदवार हे सांखळी आणि सत्तरी या दोनच मतदारसंघातील आहेत. कोणत्याही प्रक्रियेविना त्यांची भरती करण्यात आल्याचे पालेकर म्हणाले. ही मनमानी अशीच चालत ठेवायची असेल तर गोमेको च्या नावातून ‘गोवा’ काढून ‘सत्तरी मेडिकल कॉलेज’ असे नामकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी राज्याच्या दक्षता विभागाकडे तक्रार करणार आहे. आयपीएचबी फार्मासिस्टची यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु उमेदवारांचे नाव व पत्ता नाही. यावरून गोव्यात आता प्रतिभा आणि गुण महत्त्वाचे नाहीत, असे ते पुढे म्हणाले.
नोकऱया देण्यात पक्षपात करणे हा गोव्यातील तरुणांवर अन्याय असून भाजप सरकार नोकऱया देण्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार करत असल्याचा दावा पालेकर यांनी केला.
सावंत यांनी निवडणुकीपूर्वी 10 हजार नोकऱयांचे गाजर दाखवले. परंतु या 10 हजार नोकऱयांपासून ते ‘सरकार तुमच्या दारी’पर्यंत सर्व काही घोटाळा आहे. त्यामुळे या घोषणा, आश्वासनांना तरुणांनी बळी पडू नये. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करावा, असे आवाहन पालेकर यांनी केले आहे.