प्रतिनिधी/ मडगाव
कोविडच्या काळात सर्व डॉक्टर व नर्सेस तसेच इतर कर्मचाऱयांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यांनी अखंडितपणे जनतेला सेवा दिलेली आहे. त्यामुळे सर्व डॉक्टर व नर्सेस तसेच इतर कर्मचारी कौतुकास पात्र आहे. असे असताना देखील काही विरोधक आरोग्य खात्यावर टीका करतात, त्यांनी उपाय सूचवावे, त्यांच्या जरूर विचार केला जाईल असे उद्गार आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मडगावात बोलताना काढले.
कोरोनाच्या काळात योगदान दिलेल्या डॉक्टर व नर्सेस या कोविड योद्धय़ाचा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते दक्षिण गोव्याच्या नव्या जिल्हा इस्पितळात गौरव करण्यात आला. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. या कार्यक्रमाला आरोग्य खात्याचे संचालक, डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. विश्वजीत फळदेसाई, नव्या जिल्हा इस्पितळाचे नोडल ऑफिसर डॉ. राजेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोविडच्या पहिल्या व दुसऱया लाटेत डॉक्टर व नर्सेस यांनी बराच अनुभव घेतला आहे. या अनुभवातून लोकांना चांगली सेवा देण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहे. कोविडच्या काळात सातत्याने प्रोटोकॉल देखील बदलत आले आहेत. त्याप्रमाणे आरोग्य खात्याने आवश्यक ते बदल देखील केले आहे. मात्र, आरोग्य खात्यावर टीका करून विरोधक टार्गेट करीत असतात. त्यांनी टीका करतानाच उपाय सुद्धा सुचविले पाहिजेत. जर त्यांनी सूचित केलेले उपाय योग्य असेल तर आरोग्य खाते त्याची नक्कीच दखल घेणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. राणे म्हणाले.
सरकार सद्या कोविडच्या काळात सर्व गोष्टीवर लक्ष घालीत आहे. काही निर्णय वर-खाली होत असेल. पण, सरकारने कोविडच्या काळात रूग्णांना चांगली सेवा देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. सद्या काही वृत्तपत्रे देखील टीका करतात. पण, त्यांनी सत्य परिस्थिती पडताळून पाहिली पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारने 100 टक्के लसीकरणाची हाक दिलेली आहे. ती पूर्ण करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. सद्या तिसऱया लाटेची चर्चा सुरू आहे. तिसऱया लाटे पूर्वी शंभर टक्के लसीकरण झाले तर आम्ही त्याला यशस्वीरित्या टक्कर देऊ असे श्री. राणे म्हणाले.
काणकोण असो किंवा अन्य भाग लोकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा यासाठी स्थानिक आमदार व मंत्री आपआपल्या परिने प्रयत्न करीत आहे. त्यांना जिल्हाधिकारी, मामलेदार तसेच स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व नर्सेस बऱयापैकी साथ देतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना पुढे नेल्या जात आहे. जुलै अखेर पर्यंत गोव्यात लसीकरणाचा पहिला डोस सर्वांना मिळणार याकडे आमचे लक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्यखात्यासाठी आवश्यक असलेल्या साधन सुविधा पुरविल्या जात आहेत. नवीन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कार्यरत करण्यात आलेले आहे. आरोग्य खात्याकडे पुरसे डॉक्टर, नर्सेस तसेच कर्मचारी आहेत. तसेच हॉस्पिटलात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची देखील काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.