– केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटना संघर्षाच्या पवित्र्यात
नीती आयोगाकडून इ-फार्मसीला कोरोना काळात हिरवा कंदील
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून इ-फार्मसीद्वारे औषध विक्रीच्या नीती आयोगाच्या निर्णयाला औषध विक्रेत्यांनी तीव्र विरोध व्यक्त केला आहे. या मुद्यावरुन आता केंद्र सरकार आणि औषध विक्रेते यांच्यामध्ये संघर्ष होणार, हे नक्की झाले आहे.
अखिल भारतीय केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, केंद्र सरकारने सामान्य जनतेला कोविड माहिती प्राप्त व्हावी तसेच उपाययोजनांसाठी आरोग्य सेतू ऍपची निर्मिती केली आहे. केंद्र सरकारच्या निती आयोगाने वेगवेगळ्या ऑनलाईन औषध विक्री इ-फार्मसी कंपन्यांना बेकायदेशीररितीने हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. पंतप्रधान आणि निती आयोग यांच्याकडून दिल्या गेलेल्या ग्लोबल फॉर लोकल व स्वदेशीच्या घोषणा भूलथापा तर नाहीच ना, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
ऑनलाईन औषध विक्री अनुचित व बेकायदेशीर आहे. लॉकडाऊन 3 पर्यंत औषधसेवा नियमितपणे देणाऱया औषध विक्रेत्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. आरोग्य सेतू ऍपचा वापर थांबवावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. संघटनेचे सर्व सदस्य जिल्हा स्तरावरुन इ-मेलद्वारे विरोधी भावनांचे निवेदन सरकारकडे पाठवणार आहेत, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे यांनी केली आहे. लिकेज, बेकेज व एक्स्पायरी असलेला माल सर्व रिटेलर यांनी त्वरित उत्पादकाकडे पाठवावा. भविष्यात होणारे नुकसान वाचवण्यासाठी ही कारवाई करावी, असेही शिंदे यांनी सर्व विक्रेत्यांना आवाहन केले आहे.