प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील टाकळी येथे कोरोना स्वॅब तपासणीसाठी आलेल्या आरोग्य सेविकांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी सुमन मधूकर यादव (वय 56), आकाश मधुकर यादव (वय 27, दोघे रा. टाकळी) या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका दिपिका स्वफ्नील बनसोडे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
टाकळी येथे रविवारी आरोग्य सेविकांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. वैद्यकीय साहित्यही भिरकावून दिले होते. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, याबाबत पोलिसात तक्रार दिली नव्हती. काही राजकीय नेत्यांनी मध्यस्ती करून प्रकरणावर पडदा टाकला होता. अखेर सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.