गोव्या बाहेरही न जाण्याचा खुनाचा आरोप असलेल्या संशयित महिला आरोपीला कोर्टाचा आदेश
प्रतिनिधी /मडगाव
आपल्याच वडिलांचा खून केल्याचा आरोप असलेल्या आणि गेले सुमारे 20 दिवस पोलीस तसेच न्यायालयीन कोठडीत असलेल्या ज्युबेल मार्टीन या 37 वर्षीय संशयित आरोपीला मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने काही अटी घालून जामिनावर सोडण्याचा शुक्रवारी सायंकाळी आदेश दिला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयाने या संशयित आरोपीला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर व तितक्याच रकमेच्या हमीदारावर जामिनावर सोडण्याचा शुक्रवारी आदेश दिला.
इतकेच नव्हे तर संशयिताने या खून प्रकरणासंबंधी कोलवा पोलिसांना त्यांच्या तपासात सहकार्य करावे, या प्रकरणातील चौकशी अधिकारी ज्या ज्यावेळी बोलावतील त्या-त्यावेळी त्यांना सहकार्य करण्यात यावे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आणि न्यायालयात आरोपपत्र सादर करेपर्यंत संशयित आरोपी ज्युबेल मार्टीन हिने मयताच्या घरात पाय न ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे यासाठी या संशयित आरोपीने मडगावच्या सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती आणि काल शुक्रवारी आदेश दिला. संशयित आरोपी ज्युबेल मार्टीन व तिचे वडील त्रिनिदाद मार्टिन्स यांच्यात मालमत्तेवरुन वाद होता. या वादातूनच हा खून करण्याचा आल्याच्या संशयाने पोलिसांनी संशयित ज्युबेल मार्टीन हिला अटक केली होती. आपल्या वडिलांशी पटत नसल्याने ज्युबेल मार्टीन ही वेगळी रहात होती. मात्र, ज्या दिवशी खुनाचा प्रकार घडला होता, त्याच्या आदल्या रात्री ती वडिलांच्या घरी आली होती व त्यांच्यात वाद-विवाद झाला होता. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे कोलवा पोलिसांनी तिला अटक केली होती.