रविवारी आरोपीच्या जामीन अर्जावर होणार जोरदार युक्तिवाद
प्रतिनिधी/मडगाव
ग्राहकांना कोटय़ावधी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप असलेल्या व सध्या अटकेत असलेल्या आयसीआयसीआय बँकचा आर्लेम शाखेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक गुल्शन गुसाई याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.
अटक केलेल्या या आरोपीला 10 ऑगस्ट रोजी न्यायालयापुढे पुन्हा उभे करण्यात येणार आहे.
या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर 24 तासाच्या आत त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला सुरुवातीला तीन दिवसपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.
शुक्रवारी या आरोपीला पुन्हा न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने सोमवारपर्यंत गुल्शन गुसाई याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे यासाठी या आरोपीने न्यायालयाकडे अर्ज केला आहे. या अर्जाला विरोध करण्यासाठी पीडित साईनाथ पै काणे यांचे वकील मांगिरीश आंगले यांनी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. आरोपीला जामिनावर सोडण्यात येऊ नये यासाठी तपास यंत्रणाही विरोध करणार असल्याचे समजते.
आरोपीच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद रविवारी 9 ऑगस्ट रोजी न्यायालयात होणार असल्याची माहिती सुत्रानी दिली. आरोपीला अटक केलेल्या तारखेपासून आरोपी किती दिवस पोलीस कोठडीत होता, कोठडीत असताना पोलिसानी आरोपीकडून जास्तीत जास्त माहिती काढून तपास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला का, किंवा आरोपी आणखी पोलीस कोठडीत का पाहिजे याची कारणमिमांसा रविवारी 9 ऑगस्ट रोजी न्यायालयात होणाऱया युक्तिवादाच्यावेळी होणार आहे.
फसवणूक केलेल्या ग्राहकांची हानी भरुन काढण्यासाठी आरोपीची मालमत्ता कोठे कोठे आहे याची चौकशीही तपास यंत्रणेने केली का या सर्व प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणा रविवारी होणाऱया युक्तिवादाच्यावेळी न्यायालयाला देणार असल्याची माहिती सुत्रानी दिली.