पुणे /प्रतिनिधी
मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या अॅड. दीप्ती काळेचा ससून रुग्णालयातून पळून जाताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाथरुममधून पळ काढण्याचा काळेचा प्रयत्न होता. मात्र पळून जाताना आठव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. काळे यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ४२ वर्षीय दीप्ती काळेने ससून रुग्णालयाच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली, असं वृत्त आधी समोर आलं होतं. परंतु रुग्णालयातून पळून जाताना पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आठव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर गंभीर दुखापत झाल्यामुळे काळेंचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
अॅड. दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांच्यावर सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्या प्रकरणी आणखी एक तक्रार तिच्याविरोधात दाखल झाली. दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केलेल्या टोळीची दीप्ती काळे ही प्रमुख होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी तिच्यावर मंगळवारी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.