पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड
इचलकरंजी प्रतिनिधी
शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता व नगरपालिकेचा ठेकेदार सुरेश आण्णाप्पा गडगे (वय 57, रा. मगदूम बिल्डींग, इंदिरा सहकारी गृहनिर्माण सोसायटी, जवाहरनगर, इचलकरंजी) यांच्या खूनप्रकरणी एका आर्किटेक्चर व्यावसायिकाला पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली. श्रवणकुमार श्यामकुमार दायमा (वय 33, रा. स्वामी अपार्टमेंट, जवाहरनगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव असून, तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. त्याने हा खून वैयक्तिक कारणातून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
मृत सुरेश गडगे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निमुर्लन संघटनेचे माजी शहराध्यक्ष होते. तसेच ते भ्रष्टाचार विरोधी जन-क्रांती आघाडीचे संस्थापक आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करीत, भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्य़ावर आणली आहेत. मंगळवारी रात्री ते जेवण करुन, नेहमीच्या सवयीप्रमाणे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरानजीक भटक्या कुत्र्यांना बिस्कीट घालत थांबले होते. याचवेळी संशयीत आरोपी श्रवणकुमार दायमाने अचाकनपणे त्यांच्या चाकूने खूनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या मान आणि गळ्यावर झालेल्या वाराने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या आक्रोशामुळे त्यांचे नातेवाईक त्वरीत घराबाहेर आले. त्यांनी त्यांना उपचारासाठी शहरातील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या खुनातील संशयीताचा शोध घेण्याबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत असताना रक्ताने माखलेला चाकू घटनास्थळी मिळून असून तो जप्त करण्यात आला आहे. तसेच हा खून संशयीत आरोपी श्रवणकुमार दायमाने केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
यावरुन शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि सहकाऱ्यांनी शोध सुरु केला. दरम्यान, त्यांना संशयीत दायमा शहरातील नवीन नगरपालिकेसमोरील जयभीम झोपडपट्टीलगत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात लपल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरुन पोलिसांनी या परिसरात छापा टाकून बुधवारी पहाटे त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांने वैयक्तिक कारणातून खून केल्याची माहिती दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दिली.