राजस्थान रॉयल्सच्या रणनीतीत बदल क्रमप्राप्त
मुंबई / वृत्तसंस्था
आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिसची जबाबदारी जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने निश्चितच वाढणार आहे. ख्रिस मॉरिस आगामी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व करेल.
अलीकडेच, जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे चार महिने खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले, त्यावेळी तो राजस्थान रॉयल्स संघासाठी मोठा धक्का ठरला. त्याच्या गैरहजेरीत ख्रिस मॉरिसकडे जलद गोलंदाजी लाईनअपचे नेतृत्व असेल. आर्चरची अंगठय़ाची दुखापत काही प्रमाणात बरी झाली असल्याने त्याला भारताविरुद्ध कसोटी व टी-20 मालिकेत खेळता आले. मात्र, त्यानंतर दुखापतीचे स्वरुप चिघळले आणि त्याला शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
बार्बाडोसचा जन्म असलेल्या 25 वर्षीय जोफ्रा आर्चरने तिन्ही क्रिकेट प्रकारात 42 सामने खेळले असून यात त्याच्या खात्यावर 86 बळी आहेत. राजस्थान रॉयल्सने 2018 लिलावात त्याला 7.2 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. 2020 आयपीएल स्पर्धेत तो सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्काराचा मानकरीही ठरला होता.
आर्चरच्या तर्जनीजवळ आढळला काचेचा तुकडा
जोफ्रा आर्चरला जानेवारीत घरातील फिश टँक स्वच्छ करत असताना हाताची दुखापत झाली होती. त्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया केली गेली असता तर्जनीजवळ काचेचा छोटा तुकडा आढळून आला. इंग्लंडचे क्रिकेट संचालक ऍश्ले जाईल्स यांनी ही माहिती दिली. आर्चरच्या हातातून फिश टँक निसटून खाली कोसळला आणि यादरम्यान त्याला दुखापत झाली होती, असे जाईल्स येथे म्हणाले. इंग्लंडचा संघ जानेवारीत भारत दौऱयावर येण्यापूर्वी ही दुर्घटना घडली होती.