प्रतिनिधी /बेळगाव
आर्ट्स सर्कल बेळगावतर्फे शनिवार दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता आरपीडी महाविद्यालयाच्या सभागृहात रुचिरा केदार यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांना अंगद देसाई आणि रवींद्र माने तबला आणि संवादिनी साथ करतील. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे सर्कलने कळविले आहे. कलाकारांचा परिचय पुढीलप्रमाणे…
रुचिरा केदार या देशातील आघाडीच्या तरुण हिंदुस्थानी गायिकांपैकी एक आहेत. त्यांनी ग्वाल्हेर-जयपूर घराण्याच्या सर्वात आश्वासक गायिकांपैकी एक म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे. रागांच्या अत्यंत मधुर आणि तरल सादरीकरणासाठी त्यांचे नाव आहे. ख्याल, ठुमरी, दादरा, होरी, कजरी इत्यादी विविध प्रकारच्या हिंदुस्थानी संगीत प्रकारांच्या त्यांच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने त्यांना देश-विदेशातील रसिकांची प्रशंसा मिळालेली आहे.
रुचिरा यांनी प्रारंभी वडील दिलीप काळे, त्यानंतर जयपूर घराण्याच्या प्रख्यात गायिका डॉ. अलका देव मारुलकर यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन संगीताचे बारकावे शिकून घेतले. त्यानंतर प्रति÷ित आयटीसी संगीत रिसर्च अकॅडमी, कोलकाताची त्यांना निवासी शिष्यवृत्ती मिळाली. ग्वाल्हेर-जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांच्याकडून तालीम मिळाली. त्या आताही त्यांच्याकडून शिकत आहेत. बनारस घराण्याच्या अध्वर्यू पद्मविभूषण विदुषी गिरीजा देवी यांच्याकडून त्यांना ठुमरी आणि इतर उपशास्त्रीय प्रकारांमध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार आणि शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या आहेत.