प्रतिनिधी /बेळगाव
आर्ट्स सर्कल बेळगांवतर्फे रविवार दि. २७ रोजी सायंकाळी 5.30 वाजता शास्त्रीय सहगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत यांचे गायन होणार आहे. कार्यक्रमास महेश देसाई (कोल्हापूर) आणि रवींद्र माने हे अनुक्रमे तबला आणि संवादिनी साथ करतील. कलाकारांचा परिचय पुढीलप्रमाणे…..
ऋतुजा लाड (मुंबई)
वडील उमेश लाड आणि आई तनुजा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ऋतुजा लाड यांनी आपल्या गायनाचा श्रीगणेशा केला. त्यांना गुरुवर्य पं. भालचंद्र पत्रे आणि पंडिता धोंडूताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. पं. सुधीर नायक यांच्याकडून त्या संवादिनी वादनाचे शिक्षण देखील त्या घेत आहेत. सध्या विदुषी डॉ. अश्विनी भिडे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे. अनेक पारितोषिके, प्रशस्तिपत्रकांच्या त्या मानकरी आहेत.
दीपिका भिडे-भागवत (मुंबई)
दीपिका यांनी आपल्या गायनाच्या शिक्षणाची सुरुवात पं. विनायकबुवा काळे आणि श्रुती गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कालांतराने त्यांनी शुभदा पराडकर आणि पं. गजाननबुवा जोशी यांचे सुपूत्र पं. मधुकर जोशी यांच्याकडून देखील गायनाची तालीम घेतली. त्यांना जयपूर अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम गायिका धोंडूताई कुलकर्णी यांच्याकडून तालीम मिळाली आहे. उपशास्त्रीय गायनाचे त्यांचे शिक्षण शुभा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
भारतीय केंद्र सरकारने आयोजित केलेल्या युवा महोत्सवात त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. संगीत विषय घेऊन स्नातकोत्तर पदवी त्यांनी सुवर्ण पदकासह मिळविली आहे. त्याशिवाय अनेक मानसन्मान, प्रशस्तिपत्रके त्यांनी मिळविली आहेत.
महेश देसाई (कोल्हापूर)
महेश देसाई यांचे तबल्याचे शिक्षण पं. भानुदासबुवा गुरव आणि पं. आनंद असनारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांना संगीत साधक पुरस्कार, जयराम शिलेदार पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी आपल्या तबला वादनाची साथ दिलेली आहे. अनेक प्रति÷ित संगीत महोत्सवात त्यांचा सहभाग नेहमीच असतो.
रवींद्र माने
बेळगांवकरांना सुपरिचित असलेल्या रवींद्र माने यांचे संवादिनी वादनाचे शिक्षण ख्यातनाम संवादिनी वादक पं. रामभाऊ विजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार परीक्षेत त्यांनी भारतात प्रथम क्रमांक पटकाविला होता. कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या संवादिनी वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत. अनेक उत्तमोत्तम गायकांना त्यांनी समर्थ संवादिनी साथ केलेली आहे.