पूर्णिमा भट कुलकर्णी यांच्या गायन कार्यक्रमाचे आरपीडी कॉलेजच्या सभागृहामध्ये आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
सालाबादप्रमाणे आर्ट्स सर्कलतर्फे दिवाळी पहाटेच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 31 रोजी पहाटे 6 वाजता पूर्णिमा भट कुलकर्णी (बेंगळूर) यांच्या गायनाचा कार्यक्रम आरपीडी कॉलेजच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबला आणि संवादिनी साथ अनुक्रमे अंगद देसाई आणि रवींद्र माने करतील. सदर कार्यक्रमाला सर्व रसिकांना प्रवेश आहे, असे अध्यक्षा लता कित्तूर यांनी कळविले आहे.
कलाकारांचा परिचय पूर्णिमा भट
मूळच्या धारवाड येथील पूर्णिमा भट यांनी आपले गायनाचे सुरुवातीचे शिक्षण उषा दातार यांच्याकडे घेतले. त्यानंतर त्यांना पं. बसवराज राजगुरु यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय, त्यांनी पं. वसंत कनकापूर, कुसुम शेंडे, उषा चिप्पलकट्टी आणि पं. मुरली मनोहर शुक्ला यांचे मार्गदर्शनदेखील घेतले आहे.
संगीत हा विषय घेऊन त्यांनी कला शाखेची स्नातकोत्तर पदवी मिळविलेली आहे. तसेच त्या सुवर्णपदकाच्या मानकरी आहेत. कर्नाटक सरकारचा राज्यस्तरीय बहुमान त्यांना मिळालेला आहे. शास्त्रीय आणि सुगम गायनाच्या कार्यक्रमांसाठी त्यांना आकाशवाणीची ‘अ’ श्रेणी मिळालेली आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच त्या ठुमरी, कजरी, चैती, झूला, मराठी अभंग, भावगीते, नाटय़गीते, कन्नड भजने आणि वचने उत्तमरितीने सादर करतात.
निकोप आवाजाची देणगी लाभलेल्या पूर्णिमा यांचे कार्यक्रम कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, केरळ, आंध्रप्रदेश, याशिवाय अबुधाबी, वॉशिंग्टन, सॅनफ्रान्सिस्को आदी ठिकाणी झालेले आहेत. संगीत नाटक अकॅडमीने त्यांच्यावर एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. त्यांच्या काही ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. विद्यादानाचे त्यांचे कार्यही कौतुकास्पद आहे. त्यांना तबला आणि संवादिनीवर अनुक्रमे अंगद देसाई व रवींद्र माने हे साथ करणार आहेत.
अंगद देसाई
अंगद देसाई हे तंत्रज्ञानाचे स्नातक पदवीधर आहेत. लहानपणापासून त्यांना तबल्याची आवड आहे. पं. बंडोपंत कुलकर्णी व पं. संतोष कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी तबल्याचे शिक्षण घेतले. सध्या पं. कल्याणराव देशपांडे यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरू आहे. अनेक गायकांना त्यांनी समर्थपणे तबला साथ केलेली आहे. देशविदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या तबला एकल वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत.
रवींद्र माने
व्यवसायाने वकील असलेले रवींद्र माने हे लहानपणापासून संवादिनी वादनाकडे आकर्षित झाले. त्यांनी पं. रामभाऊ विजापुरे यांच्याकडे संवादिनी वादनाचे शिक्षण घेतले आहे. अनेक गायकांना संवादिनी साथ त्यांनी केली आहे आणि अनेक ठिकाणी त्यांच्या संवादिनी एकल वादनाचे कार्यक्रम झालेले आहेत.