सेन्सेक्स 976 अंकांनी तेजीत- बँकिंगचे समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजार चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी मागील दोन दिवसांच्या घसरणीची भरपाई करत नव्या उमेदीने सेन्सेक्स व निफ्टी झेपावल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये आर्थिक कंपन्यांच्या कामगिरीमुळे हा उत्साह परतला असल्याचेही शेअर बाजार अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक यासारख्या प्रमुख बँकांच्या समभागातील तेजीमुळे सेन्सेक्सने दिवसअखेर 975.62 अंकांसह निर्देशांक 50,540.48 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 269.25 अंकांच्या मजबूतीसह निर्देशांक 15,175.30 वर स्थिरावल्याची नोंद केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नुकताच चौथा तिमाही अहवाल सादर करण्यात आला असून यामध्ये बँकेने 80 टक्के इतकी सकरात्मक नफा कमाई केल्याने बँकेच्या समभागानी शुक्रवारच्या सत्रात जवळपास 4 टक्क्यांपेक्षा अधिकने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. या व्यतिरिक्त इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभागही नफा कमाईत राहिल्याचा फायदा हा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे. दुसऱया बाजूला मात्र घसरणीत पॉवरग्रिड कॉर्प आणि डॉ. रेड्डीज लॅब या कंपन्यांचा समावेश राहिला आहे.
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केल्याप्रमाणे कोरोना महामारीची दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या मध्यापर्यंत ओसरण्यास सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणे बदल दिसत असल्याने याचा फायदा गुंतवणूकदारांमधील विश्वास मजबूत होत असल्याचे पहावयास मिळाले आहे.
तेजी का परतली ?
स्टेट बँकेसह अन्य आर्थिक सेवा देणाऱया कंपन्यांच्या सकारात्मक परिणामामुळे आणि थकीत कर्जामधील सुधारणात्मक अहवालामुळे बाजाराला ऊर्जा निर्माण झाल्याने सलगच्या घसरणीला पूर्ण विराम देत बाजार सावरला आहे. कोरोना महामारीच्या संकटातही आर्थिक कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत गेल्याने सर्व क्षेत्रात लिलावाची स्थिती राहिल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.